भाग ४ - मानसी

काही दिवस कसे एकदम चैतन्य घेऊनच येतात. आजचाही दिवस काहीसा असाच होता. गजर वाजायच्या पाच मिनिटांआधीच आज आपोआप जाग आली. उठल्यावर आळसाचा लवलेशही नव्हता. सकाळची आन्हिकं उरकून जवळच असलेल्या बागेत आज बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉक साठी गेले. सकाळच्या वाफाळत्या थंडीत मस्त फिरत होते बागेत मी. रोज येणारी लोकं आपला पहाटक्रम पूर्ण करण्यात मग्न होती. कुणी धावत होतं तर कुणी गप्पा मारत जलद चालत होतं. बागेच्या मधल्या मोकळ्या जागेत वयस्क लोकांचा एक घोळका हात वर करत हसत होता. मी मात्र आपल्याच धुंदीत फेरफटका मारत होते. शेवटी दमल्यावर बागेतल्याच एका मोकळ्या बाकड्यावर जाऊन बसले. शांत वाटत होतं एकदम. थोडावेळ तसाच गेल्यावर शेवटी उठले मी. आज शनिवार असल्यामुळे ऑफिसला जायची घाई नव्हती. पण तरी घरी तर जावंच लागणार होतं.

घरी जायच्या वाटेच्या शेवटच्या वळणावर एक काकू भाज्या विकत होत्या. त्यांच्याकडनं एक हिरवीगार कोथिंबिरीची गड्डी घेतली. आज काहीतरी आवडीचं बनवून खाण्याचं मन करत होतं. मग तसंच आणखी थोडं पुढे जाऊन बेकरीतून पावही घेऊन आले. दुपारी पावभाजीचा बेत पक्का केला. नाष्ट्यासाठी पोहे बनवले, वरून आताच आणलेल्या कोथिंबिरीची मस्त सजावट केली. नाष्टा करून झाल्यावर ब्लूटूथ स्पीकर वर माझी नेहमीची प्लेलिस्ट लावली. लकी अलीच्या 'ना तुम जानो ना हम' च्या तालावर घर झाडून घेतलं. घरातलं बाकी सगळं आवरून झाल्यावर बेडवर मागे टेकत बसले. मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्स्अॅप उघडलं. नातेवाईकांचे गुड मॉर्निंग च्या मेसेजेसचे लांबूनच दर्शन घेऊन मी शेवटी ऑफिसच्या आमच्या ग्रुपचे मेसेजेस वाचू लागले. अभी ने काल रात्री कुठेतरी ट्रीपला जाण्याबद्दल विचारले होते. पण अजून कुणी रिप्लाय केला नव्हता. कदाचित सगळेच दुसरं कुणीतरी रिप्लाय करेल म्हणून थांबले होते. मीच सुरुवात करायचं ठरवलं. "मी तयार आहे" रिप्लाय करून झाल्यावर फोन चार्जिंगला लावून मी माझ्या स्टडी टेबलकडे गेले.

पेन्सिल ठेवलेल्या पानापाशी पुस्तक उघडून मी माझं वाचन सुरू केलं. येणाऱ्या यूपीएससी च्या परीक्षेची तयारी करत होते मी. काल 'ग्लोबलायझेशन' सुरू केलं होतं वाचायला. थोडंसं वाचून नंतर झोपी गेले होते. आज मात्र हा भाग वाचून पूर्ण करायचा होता. वाचता वाचता काही मुद्दे वहीत लिहून काढत होते. चांगले दोन तास मन लावून अभ्यास केला पण आता भूक लागली होती. बारा वाजले होते आणि पाव भाजी बनवायला वेळ लागणार होता.

आधी कुकर लावला बटाटा, फ्लॉवर आणि वाटाण्याचा. शिट्ट्या होईस्तोवर फ्रीजमधलं लागणारं बाकीचं सामान काढलं. चार्जिंगला लावलेला फोन एव्हाना चार्ज झाला होता. परत स्पीकरला ब्लूटूथ कनेक्ट करून मी गाणी लावली. थोड्याच वेळात कढईत भाजी बनवायला घेतली होती मी. भाजीचा सुगंध आणि गाण्यांचे सूर यांची चांगलीच जुगलबंदी चालली होती. काम करता करता ऐकू येणाऱ्या गाण्यांबरोबर मी पण गातच होते. पण मधेच येणाऱ्या नोटिफिकेशन्स मुळे सारखा आवाज वर खाली होत होता. शेवटी वैतागून हात नॅपकिनने पुसला आणि फोन सायलेंटवर टाकला. पुढचा अर्धा तास मस्त गाणी गुणगुणत गेला. पावभाजी पण तयार झाली होती. आता मोबाईलवर 'तारक मेहता' बघत बघत पावभाजीवर ताव मारायचा राहिला होता.

मोबाईल अनलॉक केला आणि बघितलं व्हाट्सअप वर 117 मेसेजेस. पण आता ते बघायला मला वेळ नव्हता. अॅप उघडून 'तारक मेहता' लावलं आणि प्लेट घेऊन मी जेवायला बसले. जाम भूक लागल्यामुळे पूर्ण भाग संपायच्या आधीच मी पावभाजी फस्त केली. उरलेली भाजी संध्याकाळसाठी झाकून फ्रिजमधे ठेवली. खरकटी भांडी आत्ता धुवायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. तृप्त होते मी या क्षणी. ती भांडी तशीच सिंक मध्ये ठेवत मी बेडरूममधे आले. पोट भरून जेवल्यानंतर सकाळचा जोश आता बेहोश व्हायला लागला होता. बेडवर पडल्या नंतर मी व्हॉट्स्अॅप वरचे मेसेज वाचू लागले. बहुतांश मेसेजेस ऑफिसच्या ग्रुपचे होते. सकाळी मी जी ठिणगी टाकली होती त्याचाच वनवा पेटला होता ग्रुपवर. एक एक करत सगळे शेवटी राजी झाले होते यायला. पण तरी अजून कुठे जायचं, कधी जायचं, कॅमेरा कोण आणणार, अशा गोष्टी ठरत होत्या ग्रुपवर. ते सगळे मेसेजेस नजरेखालून घाल्यावर ऋषभचा मला आलेला मेसेज उघडला मी.

"काय ग... आज एकदम तू सर्वांआधी यायला तयार? तब्येत ठीक आहे ना? 😀"
याला कधी सरळ बोलता येतं का नाही.
"हो तब्येत ठीक आहे माझी... वाटलं जावंसं म्हणून हो म्हटलं लगेच... आली लहर... केला कहर😎"
"ह्म्म... तुम्ही मानसीच आहात ना?? अहो हॅकर भाऊ त्या गरीब मुलीचा फोन परत करा हो तिला..."
"झालं का तुझं... किती बकवास जोक्स मारतो रे..."
"अरे!! सगळेच बकवास बकवास करता... मग हसता कशाला माझ्या जोक्सवर??😼"
"तुला वाईट नको वाटायला म्हणून हसतो रे... पण आमच्या सहनशीलतेची पण सीमा आहे😝"
"बरं जाऊदे, तुझ्या सीमेची मी नंतर गाठभेट घेईल😛 पण चांगलंय तू येतीयेस ते... नाहीतर सारखंच अभ्यास कर, नाहीतर काहीतरी रेसिपीज ट्राय कर, नाहीतर आणखी सतराशे साठ गोष्टी कर, असं काहीना काही चालूच असतं तुझं."
"मला आवडतात त्या गोष्टी करायला... आणि फिरायला सुद्धा. आणि आज मूड पण चांगला होता म्हणून मीच श्रीगणेशा केला ग्रुप वर. BTW जेवण झालं का तुझं??"
"हो तासाभरापूर्वीच झालं... तुझं?"
"माझं आत्ताच पाच मिनिटांपूर्वी झालं... मस्त पाव भाजी बनवून खाल्ली😋"
मला माहिती होतं की हे ऐकल्यावर ऋषभ चिडेल आणि झालंही तसंच.
"काय😱 पाव भाजी... इकडे मी मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली😢 आणि तू पावभाजी?? आम्हाला जर जेवायला बोलावता येत नसेल तर निदान माणसानं असं सांगून क्रूर छळ करू नये. कुठे फेडशील हे पाप😠"
"😂😂 बास कर तुझी ओवर-अॅक्टींग... मला झोप येतीए😴 बोलू नंतर."
"😠 झोप... मला असा जोर का झटका दिल्यानंतर चांगली झोप लागेल ना तुला?? पण एक लक्षात ठेव मानसी... तुला एक वेळ आज चांगली झोप लागेल पण आज खाल्लेली पावभाजी तुला पचणार नाही... मेथी खाल्लेल्या माणसाचा शाप आहे हा तुला"
"तुझे असे बरेच शाप बघितलेत मी. काही फरक पडत नाही त्यांचा माझ्यावर. पावभाजी बरोबर तुझा शापही पचवेल मी.😈 चल बाय... बोलू नंतर"

मी फोन 'डू नॉट डिस्टर्ब' मोडवर टाकला आणि डोळे मिटले. माझा पावभाजीचा मेसेज वाचल्यानंतर ऋषभचा जो चेहरा झाला असेल तो डोळ्यासमोर आला. हलकसं हसू आलं ओठांवर. त्या निर्भेळ हसूत दोन महिन्या आधीच्या दुःखाचा लवलेशही नव्हता.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १० - ऋषभ

भाग ५ - गार्गी

भाग ८ - मानसी