भाग ६ - ऋषभ

सकाळचा माझा अत्यंत कर्कश गजर वाजला. ताड्कन मी बेडवर उठून बसलो. काल थोडा सावधच झोपलो होतो त्यामुळे उठल्यानंतर नेहमीसारखं दोन मिनिटं 'मैं कहाँ हूँ?' अशी अवस्था आज झाली नव्हती. एरवी वीकेण्डला गजर न लावता झोपणारा मी आज मात्र सात वाजताच उठून बसलो होतो. नऊ वाजता शनिवारवाड्यावर पोहोचायचं होतं. सगळ्यात आधी मानसीला मेसेज केला - "GM". मला माहित होतं की ती खरं तर आधीच उठली असेल. पण मी उठलोय वेळेवर हे तिला कळवायचं होतं. तिचं झालं की ग्रुप वर आधीच काही लोकांचे आलेले मेसेज वाचून तिकडे ही मी उगवल्या ची पावती दिली. आता तयारीला लागण्याआधी एक शेवटचं काम राहिलं होतं - गार्गीला कॉल.

साधारण पाच रिंग वाजल्यानंतर गार्गीने फोन उचलला.
"हॅलो गार्गी, उठलीएस का तू?"
"हो १५ मिनिट झाले."
"अरे वा! एवढ्या सकाळी लवकर उठशील असं वाटलं नव्हतं." थोड्याशा मिस्कील आवाजात बोललो मी तिला.
"आता सरांनी सांगितलंय तर ऐकलं पाहिजे ना." तिने पण बरोबर मला टोला लगावला.
कुणी मला सर म्हटलं की विशीत साठी गाठल्यासारखं वाटतं.
"हो का? मला नव्हतं माहित एवढी आज्ञापालक विद्यार्थिनी आहेस तू. होमवर्क वाढवायला हरकत नाही तुमचा."
खरंतर तिच्या उत्तराला वरचढ असं काही बोलण्यासारखं वेळेत सुचलं नाही मला. म्हणून मी आपलं असंच काहीसं पांचट बोलून वेळ निभावून नेली.
"अहो सर... तुम्ही 'कूल सर' आहात. आणि 'कूल सर' होमवर्क देत नाहीत."
"तुमच्या या कूल सरांचं आंघोळीसाठी पाणी तापतय इथं. तुम्हीपण तयार व्हा लवकर आणि टायमावर पोहोचा शनिवार वाड्यावर. नाहीतर लेट मार्क द्यावा लागेल मला."
"आय विल बी देअर बिफोर टाइम. सी यू देअर."
"ओके. सी यू. बाय."
हिच्याशी बोलताना मला 'स्पोकन इंग्लिश' चा क्लास लावल्याचा प्रत्यय येतो. बाई मधेच फाडफाड इंग्रजी बोलायला लागतात. मग मी पण प्रवाहाच्या दिशेने पोहण्याच्या प्रयत्नात इंग्रजी झाडतो (झाडतो हे क्रियापद इथं अगदी चपखल बसतंय कारण इंग्रजी भाषेला संवेदना असत्या तर तिला 'झाडल्यासारखाच' अनुभव आला असता). तसं पाहायला गेलं तर थोडीफार सुधारणा झालीए इंग्लिश मधे माझ्या हिच्याशी बोलून बोलून (note the use of English instead of इंग्रजी. As I said - सुधारणा).

पुढच्या पाऊन तासात मी आवरून तयार होतो. मानसी चा रिप्लाय येऊन गेला होता की ती तयार आहे निघायला. गाडीची चावी घेऊन मी तिला फोन केला.
"हॅलो मानसी. रेडी?"
"हो. तुझं झालं आवरून?"
"हो, गाडीची चावी घेऊन बाहेरच पडतोय."
"तुझी सॅक घेतली? पाकीट घेतलं? चावी तर घेतलीएच तू. अजून काही राहिलंय का?"
"ए तुला वाटतं तेवढा पण विसरभोळा नाहीए मी. एकदम तल्लख स्मरणशक्ती आहे माझी." हे बोलेपर्यंत मी दाराला लावलेले कुलूप परत उघडत होतो.
हेल्मेट घ्यायचं विसरलो होतो!
"बरं. घरापाशी आलास की फोन कर. मी येते बाहेर."
"ओके. चल भेटू मग. बाय."

मानसीला पिक करून आम्ही दोघं शनिवार वाड्याला पोहोचलो. जवळच पार्किंगची जागा शोधून गाडी पार्क केली. काही जण आधीच हजर होते, काही अजून यायचे होते. सगळे शनिवार वाड्यावर जमले होते कारण आमचं असं ठरलं होतं की इकडच्या बस स्टॉप वरनं 50 नंबरच्या बसने सिंहगडला जायचं. खरंतर मला अजूनही नीट विश्वास बसत नव्हता की सगळे यायला तयार झाले - तेही बसने, भलेही सिंहगड का असेना. मनोमन मानलं मी अभीला. ग्रुप मधल्या सगळ्यांनाच काही ट्रेकिंगची हौस नव्हती. पण मग नुसतंच गाडीने वर-खाली करण्यातही काही मजा नव्हती. म्हणून मग अभीने बसने पायथ्यापर्यंत जाण्याचं सुचवलं. वरती जीपने जायचं आणि माघारी येताना पायी यायचं. अभीच्या या आयडिया वर सगळेच खुश. अशा लोकांना खरंतर लीडरशिप रोल्स दिले पाहिजेत. नाहीतर आमच्यासारखे काही महाभाग असतात ज्यांच्या नशिबात आयुष सारखे मंद आणि माजलेले टीम लीडर्स लिहीलेले असतात.

अजूनही गार्गी आणि अभीचा काही पत्ता नव्हता. राकेश अभीला कॉल करत होता आणि मी गार्गीला. ट्रिपचं सगळं प्लॅनिंग ठरल्यानंतर मी सांगितलं होतं ग्रुपवर की गार्गीही येणार आहे. कुणालाही काहीच अडचण नव्हती. उलट ग्रुपमधले बॅचलर्स मनोमन माझे आभार मानत असतील याची मला खात्री होती.
चार-पाच रिंग नंतर गार्गी चा आवाज ऐकू आला.
"हॅलो?"
"हॅलो...अगं कुठं आहेस?"
"आलेच. आताच गाडी पार्क केली. दोन मिनिटांत पोहोचते स्टॉप वर."
"ओके. आम्ही सगळे आहोत इकडेच."
फोन कट केल्यावर मानसीने विचारले, "पोहोचली का गार्गी?"
"हो... गाडी पार्क करत होती. दोन मिनिटांत पोहोचते म्हणाली."
"ओके... किती दिवसांनी आपण सगळे असे एकत्र बाहेर जातोय ना! मज्जा येईल आज खूप."
"हो. आणि याचं श्रेय जातं दोन लोकांना - पहिला अभी आणि दुसरी तू."
"मी? अभीचं समजलं मला... पण मला कशाचं श्रेय?"
"अगं कुठं जायचं म्हणजे सगळ्यांचे कमी-अधिक प्रमाणात नखरे असतात. तू काही न विचारता फक्त 'हो' म्हणालीस. त्यामुळेच बाकी पण मग जुळत गेलं. ते म्हणतात ना - 'मैं अकेला ही चला था...और कारवाँ बनता गया'. " 
"अरे बरेच दिवस नुसतं ऑफिस आणि घर चाललं होतं. त्यामुळे आलेली ही संधी कशाला सोडायची असा विचार केला मी. पण बरं झालं बाकीचे पण तयार झाले, नाही तर अभीने पायी वर-खाली करवून पायांचा भुगा पाडला असता माझ्या."
"हो... हे मात्र बरोबर बोललीस तू. हे बघ, 'शैतान का नाम लिया और शैतान हाजीर'."
"शैतान बरोबर गार्गी पण आहे."

गार्गी आणि अभी एकत्र येत होते. आमच्या घोळक्या पाशी ते आल्यावर सगळ्यांचं हाय-हॅलो झालं. गार्गी माझ्यापाशी येऊन थांबली. आता सगळे बस यायची वाट बघत होते.
"काय ग... तू आणि अभी एकत्र कसे आले?" मी गार्गीला विचारलं
"नाही, मी गाडी पार्क केली आणि इकडे येतच होते की अभिषेक सर दिसले. त्यांनी पण मला ओळखलं. मग तिथून एकत्रच आलो."
"अभिषेक सर! एवढा आदर?" मानसीने गार्गीची खेचत विचारलं.
"हो मग... माझे सीनियर आहेत ते. मग सरच म्हणणार ना?"
"मला आणि ऋषभला कधी मॅडम - सर म्हणताना नाही ऐकलं मी तुला."
"ऋषभला पण आधी सर म्हणायचे, पण तेच म्हणाले की सर नको म्हणत जाऊस. साठीत असल्यासारखं वाटतं त्यांना. आणि यु टू वर माय फर्स्ट फ्रेंड्स इन द प्रोजेक्ट, त्यामुळे तुमच्याशी अरे-तुरे बोलताना एवढं काही वाटत नाही."
मानसी माझ्यावर 'साठी' बद्दल काही डायलॉग मारायच्या आधीच बस आली. जास्त गर्दी नव्हती तरी सगळ्यांची धडपड चालू झाली बसमध्ये चढण्यासाठी. सगळ्यात शेवटी मी चढलो. मानसी आणि गार्गी लेडीज सीट वर बसल्या होत्या. मी मागे जाऊन खिडकीत बसलो. शेजारी एक कॉलेजला जाणारा मुलगा बसला होता. थोड्याच वेळात बस सुरू झाली. खिडकीतनं सकाळचा येणारा थंड वारा सुखावह होता. खिडकीला मान टेकवत बाहेरचे दृश्य बघण्यात मी विरून गेलो.

कंडक्टरच्या 'तिकीट तिकीट' हाकेने माझी तंद्री भंगली. मी अभीला, जो माझ्या पुढे दोन सीटांपार बसला होता, आवाज दिला. त्याने माझं तिकीट घेतलंय असं खुणावलं. कंडक्टरला तसं सांगत मी परत बाहेरच्या दृष्यांत हरवलो. मोठा झालो असलो तरी खिडकीतून बाहेर बघायला मिळणाऱ्या चित्रांची अजूनही ओढ होती मनाला. लहानपणी बाहेर दिसणाऱ्या नवीन गोष्टींचं कुतूहल होतं आणि आता विचारांचं वारूळ. लहानपणी बस किंवा ट्रेनमधनं बाहेर नदी दिसल्यावर आश्चर्य युक्त आनंदाने भरून येणारं मन आता त्याच प्रदूषित नदीला (खरंतर नाला म्हणलं पाहिजे) बघून हाताश होत होतं, निराश होत होतं. पूर्वी जेव्हा लोकं लहान मुलाला खिडकीची जागा मिळावी म्हणून थोडं सरकून बसायचे तेव्हा ते देवमाणूस वाटायचे. आणि आता बसमध्ये राखीव जागेवर बसून  उलट्या बोंबा मारणारे माणुसकी चव्हाट्यावर आणत होते. जसा जसा मोठा झालो तसं तसं चांगलं कमी आणि वाईटच जास्त दिसायला लागलं. जग बदललं का माझा पाहण्याचा दृष्टिकोण कोण जाणे, पण मनाला बोचणार्‍या गोष्टींत खूप वाढ झालीए.

"ए ऋषभ! उठ. किती झोपतोस अरे! उठ. पोहोचलो आपण."
विचार करता करता कधी डुलकी लागली कळलंही नव्हतं मला. अभी मला हाका मारून उठवत होता. बस जवळपास रिकामी झाली होती. अवघडलेल्या मानेला इकडे तिकडे करत उठलो मी. "काय रे... ऑफिसमधे झोपा काढतोस ते समजू शकतो मी. मस्त एसी असतो आणि कामही बोरिंग. पण एवढ्या धाडधाड आदळणाऱ्या बसमधे कशी काय झोप लागते रे तुला?"
"टॅलेंट आहे भाऊ ते आपलं. तुला जशी ट्रेकिंग प्यारी आहे ना तशी मला झोप. आणि सकाळी लवकर पण उठावं लागलं ना आज. त्यामुळे डुलकी लागली रे." बसमधनं उतरत मी त्याला म्हणलं.

मी आणि अभी येण्याने आमचा घोळका आता पूर्ण झाला होता. अभीने सूत्र आपल्या हातात घेत सगळ्यांना विचारलं, "बरं आता काय करायचं? लगेच जायचं गडावरती का काही खाऊन पिऊन निघायचं?"
पुढची पाच मिनिटं सगळे संसदेत असल्याप्रमाणे वाद - विवाद (म्हणजे इथे तरी बरं चाललं होतं कारण इथे विवाद तरी होता. नाहीतर संसदेत एरवी वादच होत असतात) करत होते. मुलं सगळी खादाड, खाऊन निघायच्या मताची होती. मुलींचा मात्र नंतर ऊन जास्त होईल म्हणून लवकरात लवकर वरती जाण्याचा आग्रह होता. शेवटी अभीने परत एकदा मधला मार्ग काढत दोन्ही गटांचे समाधान केलं. 
"एक काम करू आपण. पटकन एक चहा घेऊ आणि मग वर जाऊ. वर मस्त पिठलं भाकर आणि दहीवर ताव मारू. ठीके?"
सगळ्यांनी होकार कळवल्यावर चहापाणी करून आम्ही जीपकडे निघालो. त्या कोंबलेल्या जीपमध्ये मी अंग चोरून सगळ्यात मागे बसलो होतो.
"ऋषभ, झोपू नकोस रे आता. नाहीतर कधी पडशील कळणार पण नाही" अभी हसत म्हणाला.
"हा जीपवाला ज्या पद्धतीने जीप चालवतोय ना, त्याने माझी झोप कधीच उडालीए. त्यामुळे झोपायचं टेन्शन नाही."

थोड्याच वेळात सगळे जीपमधनं उतरत होते. ऊन जरी थोडं चढणीला आलं होतं तरी वरती वाहणारा थंड वारा ते जाणवू देत नव्हता. मस्त वाटत होतं एकदम. सगळे उतरल्यावर आम्ही गडाच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. आमच्या ग्रुपचे फोटोग्राफर, राकेश भाऊ यांनी अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक त्यांच्या बागेतून DSLR कॅमेरा बाहेर काढला. आजूबाजूच्या हिरवळीचे (नैसर्गिक आणि कृत्रिम) फोटो काढून झाल्यावर त्याने कॅमेरा गळ्यात अडकवला. कॅमेरा बाहेर निघताच याचा कायापालट होतो. चालण्याची ऐट, बोलण्याची ढब आणि खाण्याचा भाव सगळं बदलतं. आताही तसंच झालं. रकेशचा कॅमेरा बघून मुलींचं माझा फोटो, माझा फोटो, सुरू झालं. कुणालाही नीट ओळखत नाही म्हणून काल चिंतेत असणारी गार्गी आज बाकी दोघींच्या गळ्यात पडून पडून फोटो काढत होती. जणू जन्मा जन्मापासून च्या मैत्रिणी. राकेश पण थोडंसं इकडे, थोडंसं तिकडे, सांगून सांगून त्यांची सिग्नेचर 'वाकडी मान' पोज बदलायचा प्रयत्न करत होता.

अभी मात्र आता डोळे आभाळाला भिडवत सगळ्यांना 'चला चला' म्हणून विनवत होता. लग्नाच्या वराती सारखी आमची टोळी हळूहळू पुढे जात होती. गडाच्या कडेकडेने जात आजूबाजूचा निसर्ग खरंच मोहवणारा होता. वाहणाऱ्या वार्‍याच्या आवाजात स्वतःच्या मनाचा आवाजही ऐकू येईनासा झाला होता. शांतता होती, फक्त शांतता. बरंच फिरून झाल्यावर आता सगळ्यांना जाम भूक लागली होती. गडावरच पिठलं भाकरी खाल्ली. सगळे खाली बसून एकत्र जेवत होते. जेवताना एकमेकांची चेष्टा मस्करी चालली होती. भुकेचा तडाखा एवढा होता की ताटाचा फोटो काढण्याची ही सवड नव्हती कुणाला. दहीच्या मडक्यांची तर गणतीच विसरून गेलो. सगळ्यांचा पोटोबा झाल्यानंतर आता परत फोटोबाचा कार्यक्रम सुरू झाला. अभी मधेमधे इतिहासाचे धडे देत होता. एकूण सगळं व्यवस्थित चाललं होतं. सगळेच एन्जॉय करत होते. 

फिरता-फिरता आम्ही पाण्याच्या टाकीपाशी आलो. गडावरची जमीन एकसारखी नव्हती. सगळ्यांशी बोलण्यात व्यस्त असणार्‍या गार्गीचं लक्ष तिच्या पायाखालचा जमिनीकडे नव्हतं. तिचं पुढचं पाऊल एका छोट्या खड्ड्यात पडलं आणि ती वेदनेने ओरडत मटकन खालीच बसली. सगळे एकदम सावध होऊन तिला उठण्यासाठी मदत करू लागलो. गार्गी उठून जवळच एका दगडावर बसली. तिचा पाय चांगलाच मुरगळला होता. थोडा वेळ थांबून ती उठू लागली पण तिला चालता येईना. अभी ने त्याच्या जवळचा मूव चा स्प्रे दिला. गार्गी ने तो तिच्या दुखणाऱ्या पायावर मारला. तोपर्यंत सगळ्यांचं माघारी परतायचं मत बनलं पण जीप कडेही जाणं गार्गीला शक्य नव्हतं. तिच्यामुळे सगळे अडलेत हे तिला पाहवत नव्हतं. ती सगळ्यांना वनवत होती की तुम्ही राहिलेला गड बघून या. यावेळेस मग मी मधला मार्ग काढला. मी गार्गी सोबत तिकडेच थांबण्याचं ठरवलं. बाकी सगळे राहिलेला गड फिरूस्तोवर गार्गीचीही परिस्थिती चालण्याएवढी सुधारेल. हो-नाही करत करत सगळे मान्य झाले (फार विचित्र वाटलं मला त्यावेळी. असं माझ्याबाबतीत फार क्वचितच घडतं).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १० - ऋषभ

भाग ५ - गार्गी

भाग ८ - मानसी