भाग १० - ऋषभ

आजच्या जमान्यात वेळेचा आणि नात्यांचं एक... अम्... विशेष नातं आहे (लहानपणी भाषेचा विशेष जरा कच्चा होता). तुमच्यासाठी कुठलं नातं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही किती वेळात मेसेजचं उत्तर देता त्यावर ठरतं. आणि जसा-जसा वेळ जातो तसा-तसा तो सुरुवातीचा मेसेज यायला ही...अम्... वेळ लागतो (खरं सांगायचं तर भाषेचा विषय जास्तच कच्चा होता). मलाही थोडा वेळ आणि अंतर हवं होतं दोन वर्षांपूर्वी (आईन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी कळत नसली तरी टाईम अँड स्पेस किती महत्त्वाचे आहेत ते कळलं मला तेव्हा). माझ्याकडनं कुठलाही निर्णय सहजासहजी होत नाही. प्रत्येक निर्णयाच्या आधी त्याचं विश्लेषण होतं. असं केलं तर, तसं केलं तर अशा रिहर्सल्स होतात डोक्यात. पण मी मानसीला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा यातलं काहीही घडलं नाही. अजूनही मला आश्चर्य वाटतं की मी मानसीचा होकार इतका कसा गृहीत धरला होता. अर्थात ती नाही म्हणू शकते हे माहीत होतं मला पण ती नाही म्हणेल याची मी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळेच जेव्हा तिने तिचा अबोल नकार कळवला तेव्हा आधी म्हणल्याप्रमाणे गाढवा सारखं वाटत होतं मला.

पुढे जरी गोष्टी थोड्या पूर्ववत व्हायला लागल्या होत्या तरी अधे मधे मला तो गाढवपणा जाणवायचा. कधीकाळी एकमेकांना ऑफिसमधल्या कुणाच्यातरी नावाने चिडवणारे आम्ही आता त्या मुद्द्याला चार हात लांबच ठेवत होतो. त्या आठवणींपासून, त्या घुसमटीपासून दूर जावसं वाटत होतं मला.

इनबॉक्स मध्ये नेहमीच या न त्या जॉब्सचे सतराशे साठ मेल्स पडलेले असायचे. एरवी त्यांना डिलीट करण्याइतकाही भाव न देणारा मी आता मात्र दुसरीकडे कुठे आपला नंबर लागू शकतो का ते बघत होतो. काही महिन्यांच्या प्रयत्नांनंतर आणि बऱ्याच मुलाखतींनंतर शेवटी एका जागी आपले सूर जुळले. ऑफिसच्या ग्रुपला याविषयी 'चाय पे चर्चेसाठी' आमंत्रित केलं. तोपर्यंत मी ही गोष्ट सगळ्यांना सांगण्याबद्दल विचारही केला नव्हता. मी कुठल्या गोष्टींपासून दूर जातोय हे मला माहीत होतं पण त्याबदल्यात कुठल्या गोष्टी मागे सोडाव्या लागणार आहेत याची जाणीव तेव्हा झाली मला. सगळ्यांना मी माझ्या नवीन जॉब बद्दल सांगितलं. शब्दांना वजन असतं म्हणजे काय हे तेव्हा कळालं. आवाजाची पट्टी न ढळू देता मी सांगितलं की मी इथं फक्त आता महिनाभर  राहणार आहे. राकेशचा राकटपणा, अभीचा उत्साह, मानसीचा समजूतदारपणा आणि गार्गीचं भोळेपण मी खरंच खूप मिस करणार होतो. अलिशान पलंगावर  झोपणाऱ्याला जसा फक्त एका टोचणाऱ्या गोष्टीचा त्रास होतो तसंच मला पण माझ्या मनाला टोचणाऱ्या गोष्टीच सध्या जास्त सतावत होत्या. त्यामुळे सगळ्यांना सोडण्याचं जरी दुःख होतं तरी माझ्या निर्णयावर मी ठाम होतो. शिवाय राजीनामा आयुषच्या तोंडावर मारताना (ही गोष्ट निव्वळ  काल्पनिक आहे, असं तोंडावर मारण्याची संधी खऱ्या आयुष्यात मिळत नसते) होणारा आनंद मनाला गुदगुल्या करत होता.

भूतकाळाचं हे भूत बाहेर निघायचं कारण म्हणजे मानसीचा ग्रुप वर आलेला मेसेज. तिचं लग्न ठरल्याची आनंदवार्ता तिने सगळ्यांना सांगितली होती. लग्नासाठी कोल्हापूरला यायचं निमंत्रण दिलं होतं तिने सगळ्यांना. ते वाचून मला लग्न पत्रिकेत 'आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं!' याची आठवण झाली. मी लगेच 'काँग्रॅच्युलेशन्स'चा मेसेज केला. जॉब सोडल्यानंतर हळूहळू ग्रुप वर ही हालचाल मंदावली होती. आधी दिवसाला दीडशे मेसेज पडणाऱ्या ग्रुपवर आता दीडशे दिवसात एक मेसेज बघायची वेळ आली होती. त्यामुळे मानसीच्या लग्नाची बातमी अनपेक्षितच होती. मला माहित नाही की मी ती बातमी वाचल्यावर मला काय वाटायला हवं होतं. खरंतर मला काहीच वाटत नव्हतं. आणि ही गोष्ट मला सतावायला लागली. थोड्यावेळासाठी वाटलं की सुरैयाने सांगितल्याप्रमाणे 'आपले दिल के सगळेच अरमान आसुओं में बह गए' की काय? पण नंतर जाणवलं की ही सगळी वेळेची करमत आहे. असं नाही की नुसतंच वेळ गेल्याने मी ते दुःख विसरलो होतो, पण वेळेबरोबर मी थोडा शहाणाही झालो होतो (म्हणजे निदान माझं तरी असं मत होतं). ज्या गोष्टीपासून मी लांब राहण्याच्या प्रयत्नात लांब राहायला आलो होतो ती गोष्टच आता राहिली नव्हती (बरं! ठीक आहे! भाषेच्या विषयात काठावर पास झालो होतो मी).

मानसीच्या लग्नाला जायच्या फुल तयारीत होतो मी - मानसिकरीत्या. पण ग्रुप मध्ये कोण काय बोलेचना जाण्याविषयी. मला वाटलं एखादा सिक्रेट ग्रुप वगैरे बनवला असेल पोरांनी मानसीच्या गिफ्टचं सरप्राईज नको फोडायला म्हणून. दोन दिवस थांबून मी अभीला मेसेज केला, "हाय..."
"हाय... एवढ्या दिवसांनी कशी काय आठवण काढलीस रे?"
"अरे बर्‍याच दिवसांनी ग्रुप वर थोडी ऍक्टिव्हिटी झाली मानसीच्या मेसेजमुळे. म्हणलं सगळ्यांचे हालचाल विचारावेत पर्सनली..."
"अरे वा! म्हणजे तुझा मेसेज यायला लोकांनी आता डायरेक्ट लग्नच करावीत. पूर्ण आयुष्यात म्हणजे चार
वेळाच मेसेज येणार तुझा."
"असं कसं म्हणू शकतोस तू अभी? तुझ्या लग्नाच्या वेळेस तुला थोडी डिस्टर्ब करणार मी... त्यामुळे तीन वेळाच मेसेज येईल तुला 😜"
"सुधारणार नाहीस तू..."
"ते जाऊदे... प्लान काय आहे जायचा ते सांग..."
"काहीच नाहीए बाबा... कामाचा जाम लोड आहे... दांडी नाही टाकता येणार. आणि बाकीचे पण कोणी जास्त इंटरेस्टेड नाही वाटत..."
"अरे आपल्या ग्रुप मधलं पहिलं लग्न आहे... असं कसं म्हणतोस तू..."
"हो... पण हे कारण ऑफिसवाल्यांना नाही देता येत ना..."
मला एकट्याला लग्नाला जायचं नव्हतं. 'साम' वापरून झाला होता आता 'दाम'ची पाळी होती.
"अरे लग्न कोल्हापूरला आहे म्हणल्यावर मला वाटलं होतं तू ट्रिपच प्लान करशील म्हणून. कोल्हापूर म्हणलं की पन्हाळा, पन्हाळ्याचा तो इतिहास, नवीन गड, नवीन ट्रेक... परत अशी संधी थोडी मिळणारे..."
"ह्म्म...हा विचार नव्हता केला मी. ठीक आहे सांगतो मी तुला एक दोन दिवसात काय ठरतंय ते."
"ओके बॉस."

दोन दिवसात अभीचा होकारार्थी रिप्लाय आला होता. अभी सगळं प्लान करतोय म्हणजे बाकीच्यांना फक्त हजेरी लावायची होती. एक-एक करत सगळे तयार झाले यायला. मानसीला सरप्राइज द्यायचं म्हणून आम्ही तिला येण्याबद्दल काही सांगितलं नाही. आता फक्त मुहूर्ताची वाट बघायची होती.

गुरुवारी रात्री सगळे अभीच्या रूमवर पोहोचलो. गार्गीला तिच्या घरून पिक करायचं होतं. खूप दिवसांनी एकत्र येणार म्हणल्यावर रात्रभर धिंगाणा झाला. पहाटे ३ला गाडी अभीचा पत्त्यावर आली. सगळे आधीच बॅगा घेऊन रस्त्यावर आलो होतो.आजूबाजूची कुत्री आम्हाला बघून भुंकत होती. पण जॉब लागल्यापासून आता ते ऐकण्याची सवय झाली होती त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नव्हता. थोडावेळ भुंकल्यानंतर कुत्री पण गप्प झाली. त्यांना पण कळलं की ही लोकं आपल्या ही पुढची आहेत. काहीही झालं तरी शेवटी आपलीच लोकं आपल्याला ओळखतात. गाडी आल्यावर अभी पुढे बसला. मी आणि राकेश मागे पसरलो - थोड्यावेळासाठीच. गार्गी आली आणि माझ्या बाजूला येऊन बसली. वर्ष झाला असेल तिला प्रत्यक्ष बघून. आल्या आल्या एकदम उत्साहित आवाजात सगळ्यांना हाय-हॅलो केलं तिने. किती दिवसांनी भेटतोय आणि बाकीचे अपडेट्स पुढचा अर्धा तास चालले. रात्रभर जागल्यानंतर आता डोळे मात्र जड होत होते. बाजूला राकेश खिडकीला टेकून घोरू लागला होता. मी मात्र सरळ बसून झोपायचा प्रयत्न करत होतो. मान इकडे नाही तर तिकडे पडायची. माहित नाही किती वेळ झाला होता पण मध्ये जेव्हा जाग आली तेव्हा माझं डोकं गार्गीच्या खांद्यावर होतं आणि ती खिडकीला टेकून झोपली होती. स्वतःशीच हसून मी परत डोळे मिटले. डोळे मिटताना पुसटसं काहीतरी आठवत होतं पण ते नक्की काही हाती येत नव्हतं. आठवणींच्या मागे पळताना परत कधी झोप लागली कळलंच नाही. 

"ऋषभ उठ. आलं कोल्हापूर...ऋषभ" गार्गीच्या आवाजाने मी उठलो. 
माझं डोकं अजूनही तिच्या खांद्यावर होतं. ओशाळत मी तिला "सॉरी" म्हणालो.
"चालतं रे!" ती हसत म्हणाली.
"आम्ही बॅगा घेऊन रुमवर पोहोचलो. आमच्या तिघांचं आवरून होईस्तोवर गार्गीचं ही आवरून होईल असा आमचा अंदाज होता. साधारण दोन तासात आम्ही तिघे जवळजवळ तयार झालो होतो. लग्न तसं १२ चं होतं पण आमचा लग्नाआधीच मानसीला भेटण्याचा प्लान होता. राकेशचं अजून ही क्रीम लाव, तो परफ्युम मार चाललं होतं. अभी कॅमेरा आणि बाकी सामान चेक करत होता. माझं आवरून झालं होतं. परफ्युम च्या सुगंधाने मरण्यापेक्षा थोडी मोकळी हवा खावी म्हणून मी खाली रिसेप्शन पाशी सोफ्यावर जाऊन बसलो. टेबलावर ठेवलेला पेपर वाचायला घेतला. थोड्यावेळात गार्गीचा "हाय!" कानावर पडला. मी पेपरमध्ये घातलेल्या डोकं वर काढलं आणि माझ्या तोंडून निघालं -
"आई शप्पथ!" (ह्या अशा गोष्टींमुळेच मी अजून सिंगल आहे हे सांगायला नको)
"म्हणजे छान दिसतीएस एकदम गार्गी तू."
"थँक्यू ऋषभ! बाकीचे कुठे आहेत? अजून तयार झाले नाहीत?"
(आता साधा शिष्टाचार म्हणून कोणीही तू पण छान दिसतोएस असं म्हणलं असतं पण गार्गीने ते म्हणलं नाही म्हणजे माझ्या अवताराची कल्पना करू शकता तुम्ही.)
"नाही राकेश सुगंधालय उघडून बसलाय आणि अभी सगळं घेतलंय का नाही त्याचा हिशोब लावतोय."
"सुगंधालय?"
"हो, इतक्या डिओ च्या बाटल्या आणल्यात त्याने की कलिंगडावर माशा बसतात तशा लग्नातल्या सगळ्या मुली याच्यावर बसणार आहेत. म्हणजे निदान त्या अॅड्सचं उदाहरण घेतलं तर."
तो सीन डोळ्यांपुढे आल्याने दोघेही हसू लागलो.
"अभी आणि राकेश थोड्यावेळात खाली आले. राकेश बरोबर आलेला त्याचा परफ्युम माझ्या नाकाला झोंबल्याबरोबर मी गार्गीकडे बघितलं. तिनंही तेव्हाच माझ्याकडे त्याच कारणामुळे बघितलं. दोघेही परत हसू लागलो. बाकी दोघं काय झालं म्हणून विचारू लागले पण मी त्यांचा प्रश्न बरोबर टोलावला.

यावेळेस मी पुढे ड्रायव्हर सोबत बसलो. गुगल मॅप्स उघडून ॲड्रेस चेक केला. जास्त लांब नव्हतं तिचं गाव. सिटीतनं बाहेर पडूस्तोवर मी ड्रायव्हरला सूचना देत होतो. एकदा गाडी मेन रस्त्याला लागली की मी शांत झालो. कालच्या मस्तीनंतर सगळ्यांबरोबर घालवलेला वेळ आठवू लागलो. ते एकत्र डबा खाणं, डबा खाऊन झाल्यावर पोटभर एक दुसऱ्याला चिडवणं, डोळ्यात पाणी येईस्तोवर हसणं,  शिव्या देत दुसऱ्याला मदत करणं, राकेशचे मुलींबरोबरचे किस्से, मी केलेल्या टिंगलीचा तेवढंच तिखट प्रत्युत्तर देणारी मानसी, कधी जास्तच केलं मी की मारक्या म्हशीसारखी तिची ती नजर, कुठे फिरायला गेलो की तोंडाला फेस येईस्तोवर त्या जागेचं महात्म्य सांगणारा अभी, कुणी लक्ष देत नाहीए हे बघितल्यावर 'जा मरा' म्हणायचा, पण "सॉरी" म्हणलं थोडं "सांग सांग" केलं की सगळं विसरायचा, ग्रुपमध्ये सगळ्यात शेवटी आलेली गार्गी, आल्या आल्या लगेच सगळ्यांना आपलंसं करणारी, तिचं ते इंग्रजी झाडणं आणि आमच्याकडनं पुणेरी चेष्टा-मस्करीचे धडे घेणं, सगळंच कसं भारी होतं. आयुषला दूषणं देण्यात होणारी आमची चढाओढ, आणि त्याने होणारा हास्यकल्लोळ, मस्त दिवस होते ते. 

आठवणींच्या दुनियेत वेळ कधी गेला कळलंच नाही. आम्ही लग्नस्थळी पोहोचलो. सवयीप्रमाणे सगळ्यात शेवटच्या रांगेत जाऊन बसलो. कार्यालय जवळ जवळ रिकामंच होतं. स्टेजवर मानसीच्या नावाची घोषणा करत होते. दोन मिनिटात मानसी शेजारच्या रूममधून बाहेर आली. सुंदर दिसत होती ती खूप. बर्‍याच दिवसांनी तिला बघितलं होतं - तेही साडीत! तिची नजर आमच्या घोळक्यावर पडली. तिच्या चेहऱ्यावर ओळख दिसली. आम्ही सगळ्यांनी हात वर करून आम्ही आलो आहोत ते कळवलं. तिने पण हलकं हसत मान हलवून प्रतिसाद दिला. मानसीचा मेसेज जेव्हा ग्रुपवर वाचला होता तेव्हा विशेष असं काहीच वाटलं नव्हतं मला. पण आता मात्र आनंद होत होता. दुसऱ्याचं भलं झालेलं बघून जो आनंद होतो तो होत होता. मागे झालेल्या अप्रिय गोष्टींच्या पुढे जाऊन आपण मनापासुन कुणाचं तरी भलं इच्छितोय याचं पण मनाला बरं वाटत होतं. त्या कडवट आठवणी अजूनही माझ्या आयुष्याचा भाग होत्या, पण माझ्या आयुष्याच्या कथेत त्यांच्यासाठी तेवढा एकच भाग लिहिला गेला होता. 

मानसीला भेटायला आम्ही सगळे स्टेजपाशी आलो. मला नक्की काय बोलावं सुचेना आणि ज्या नेहमीच्या गोष्टी बोलण्यासारख्या असतात त्या आधीच पठ्ठ्यांनी बोलून ठेवल्या होत्या. मानसीने जेव्हा माझ्या मौनाबद्दल मला डिवचलं तेव्हा मात्र राहवलं गेलं नाही मला. नेहमीच साध्या राहणीत पाहिलेल्या मानसीला जेव्हा मी त्या मेकअपच्या थरामध्ये बघितलं तेव्हाच मनात आलेलं - 'केवढा हा मेकअप? साधीच छान दिसली असती'. म्हणून मी तिच्या मेकअप बद्दल टोला लगावला तिला. तिने कदाचित लग्न होतं म्हणून प्रतिटोला नाही हाणला. पण हसत हसत जाताना "नाही सुधारणार तू" म्हणून गेली (या वाक्याचा एक टीशर्टच बनवून घ्यायला पाहिजे मी). मानसीला भेटून आम्ही परत आमची जागा गाठली. लग्न लागेपर्यंत आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या. बऱ्याच महिन्यांचा बॅकलॉग क्लियर केला आम्ही.

साधारण बारा वाजले होते. आम्हाला उत्सुकता लागली होती सगळ्यात महत्त्वाच्या घोषणेची -  जेवणाच्या घोषणेची. लग्न वेळेवर लागलं आणि त्यानंतर आम्ही जेवणावर ताव मारला.  कावरेचं श्रीखंड तर एक नंबर होतं. मनाने आणि पोटाने तृप्त होऊन आम्ही नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यास सिद्ध झालो. खरंतर ही खबरदारी सगळ्या इच्छुक वधू-वरांनी घेतली पाहिजे. लग्नातल्या जेवनाकडे एकदम काटेकोर लक्ष द्यायला हवं. कारण तृप्त झालेले लोक त्यांना मनापासून आशीर्वाद देतील आणि त्यांचे पुढचे आयुष्य सुखमय होईल. शेवटी 'जेवण हैं तो जीवन हैं' असं उगीच म्हणत नाही लोकं. मानसी आणि कुणाल बरोबर फोटो, सेल्फी काढून झाल्यावर आम्ही आमची भेटवस्तू त्यांना सुपूर्द करून स्टेजवरून खाली आलो.

कालच्या प्रवासाने आणि पोटातल्या श्रीखंडाने आता सगळेच पेंगले होते. सगळे हॉटेलवर माघारी आलो आणि आराम करायचा ठरवला. संध्याकाळी भेटायचं ठरवून सगळे झोपले. संध्याकाळी सहा वाजता उठून सगळे तयार झाले. रंकाळा तलाव बघायला आम्ही बाहेर पडलो. तळ्याभोवती राकेशने आमचे आणि सवयीप्रमाणे हिरवळीचे फोटो काढले. नंतर आम्ही मिसळ खायला गेलो. कोल्हापूरची मिसळ खायला सगळेच उत्सुक होते. पण जेव्हा मिसळ प्लेटमध्ये ब्रेड बघितला, मूडच गेला सगळा. तरी मिसळीचा मान राखत आम्ही पोटभर मिसळ खाल्ली. मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही परत रंकाळ्याच्या काठी आलो. आणखी थोडावेळ गप्पा मारल्यावर अभीने माघारी हॉटेलवर जाण्याचा विषय काढला. रात्रीचा थंड वारा तळ्याच्या कठड्यावर बसल्याबसल्या छान वाटत होता. माझं तर मन नव्हतं इतक्यात माघारी जाण्याचं. शेवटी अभी आणि राकेश निघाले हॉटेलकडे. मी आणि गार्गीने थोडावेळ तिथंच बसण्याचं ठरवलं.

काही काळ शांततेत गेला. नंतर मी गार्गीला म्हणालो, "मस्त वाटतोय ना थंड वारा चेहर्‍यावर. शांत वाटतंय किती."
"हं... तुला माहितीए मला कशाची आठवण येतीए?"
"कशाची?"
"आपल्या नाईट शिफ्टस्ची! फक्त कठड्याऐवजी आपण ओएटीच्या पायऱ्यांवर बसायचो."
"हो... आणि प्रदूषित पाण्याऐवजी रातराणीचा मस्त सुगंध दरवळायचा."
"हो... आणि आपल्या कधीही न थांबणारा गप्पा."
"त्या कधीच न थांबणाऱ्या होत्या कारण बोलताना तुला थांबवण्याची कुणाचीच हिंमत नव्हती."
"ए, मी एवढं पण नव्हते बोलत बरं का!"
"हा सेम डायलॉग मारायचीस तू त्यावेळेस पण."
"तू काय कमी आहेस का बोलण्यात? तुला पण तेवढंच बोलायला लागतं."
"हो, पण मी शक्यतो जवळच्या माणसांपाशीच तेवढं बोलतो. पण तू मात्र कुठल्याही अनोळखी माणसाने 'टीम मध्ये नवीन का?' विचारलं, तरी मोठ भाषण देतेस."
"तू मला ती गोष्ट कधीच विसरु देणार नाहीएस ना."
"नाही, जोपर्यंत माझ्या लक्षात आहे तोपर्यंत तरी नाही."
मग ओएटीच्या पायऱ्यांवर व्हायच्या तशाच गप्पा रंगल्या आमच्या. खूप दिवसांनी एवढं मनमोकळं बोललो होतो मी कुणाशी तरी. त्या गप्पांच्या ओघात आमच्या दोघांत थोडं फार चालायचं त्या फ्लर्टींगचीही आठवण झाली.

गार्गी सोबत फ्लर्टींग नेहमीच सोपं वाटायचं. कारण तिचं मन साफ होतं. माझ्या कुठल्या बोलण्याचा ती विकृत अर्थ लावेल असं कधीच वाटलं नाही मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्याविषयी माझ्या मनात मैत्री पलीकडे कुठल्या भावनाही नव्हत्या. त्यामुळे कोणाला इम्प्रेस करायचं दडपणही नसायचं. गार्गी एक कॉन्फिडन्ट नव्या युगाची मुलगी होती. तिचं माझ्याबरोबर फ्लर्टींग ही मी त्याच स्पिरिट मधे घेतलं होतं. आमचं कॅज्युअल फ्लर्टिंग कधीकधी मात्र माझ्याही कम्फर्ट लेवलच्या बाहेर जायचं. तिच्या मैत्रीचा खूप आधार होता मला माझ्या काही निराश दिवसांमध्ये. एन्जॉय करायचो मी तिची कंपनी, अगदी आज एवढ्या दिवसानंतर करत होतो तशीच.

गप्पा मारता मारता आता बराच उशीर झाला होता. दोघं परतीच्या वाटेला लागलो. उद्याच्या पन्हाळ्याच्या ट्रेक बद्दल दोघेपण एक्साईटेड होतो. आमच्या मागच्या एकत्र ट्रीपच्या - सिंहगडच्या - आठवणी निघाल्या. बोलता बोलता पंधरा मिनिटांत आम्ही हॉटेल वर पोहोचलो. पहिल्या मजल्यावरच्या आमच्या रूम्स पर्यंत आलो. एकमेकांना "गुड नाईट" म्हणून झालं. तिने तिचा दरवाजा उघडला आणि तेवढ्यात मी तिला आवाज दिला.
"गार्गी!"
"काय रे?"
"उद्या नीट बूट घालून ये, नाहीतर परत पाय मुरगळेल तुझा" तिची खेचण्यासाठी मी म्हणालो.
"पाय मुरगळला तर आहेस की तू सांभाळायला." हसत उत्तर देत ती तिच्या रुममध्ये गेली.
"हो ते तर आहेच." स्वतःशीच हसत मी पुटपुटलो.

झोपण्यासाठी मी डोळे मिटले. मानसीचा लग्नातला हसरा चेहरा डोळ्यासमोर आला. माझ्या आयुष्याच्या कथेचा आज एक अध्याय पूर्ण झाला होता. उद्यापासून कदाचित नवीन अध्याय चालू होईल. गार्गीचं मगाचं वाक्यही डोक्यात घुमत होतं - "तू आहेस की सांभाळायला". पुढच्या वाटचालीचा जरी एक धूसर अंदाज होता तरी माझ्या या आयुष्याच्या कथेचा शेवट काय याचा अंदाज लावता लावता कधीतरी मी निद्रेच्या कुशीत समावलो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग ५ - गार्गी

भाग ८ - मानसी