भाग ८ - मानसी
आरशासमोर बसलेली मी माझ्या प्रतिबिंबाकडे बघत होते. स्वतःकडे बघून हलकेच हसत होती. अंघोळ केल्यावर सुद्धा चेहऱ्यावरची हळदीची सुवर्णछटा अजून काही पूर्ण गेली नव्हती. उद्या येणाऱ्या सुखमय क्षणांची आजच्या हळदी समारंभात पाऊलखुणा दिसल्या होत्या. लग्नघर असल्यामुळे घरात काही ना काही गडबड चालूच होती. पाहुण्यांची कार्यक्रमाची तयारी, नातेवाईकांचे सल्ले, माझे मेकअप-कपडे, फोटोग्राफरच्या सूचना असं सगळा सकाळपासून कल्लोळ माजला होता. पण तरी सगळं कसं जुळून येऊन व्यवस्थित पार पडत होतं काय माहित. तसंही मला या गोष्टींची जास्त तसदी घ्यायची नव्हती. मला फक्त उद्याची वाट बघायची होती - लग्न समारंभाची - त्याच्याबरोबरच्या आयुष्याची.
आपल्याकडे जशी बहुतेक लग्न ठरतात - तसंच माझंही ठरलं होतं - 'अॅरेंज्ड मॅरेज'. काम करता करता तीन वर्षे होऊन गेली होती. कामात मी सेटल झाले होते. घरच्यांनी माझ्याकडे लग्नाचा विषय काढला आणि मी माझी मंजुरी दिली. आयुष्यात जे काही मिळवायचं होतं ते ते मी बऱ्यापैकी मिळवलं होतं. मुळात माझ्या आयुष्याकडून अपेक्षा साध्याच होत्या. माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटावा असं करणं, मी जे काही काम करेल त्यात प्रावीण्य मिळवणं, आणि ज्याच्याबरोबर भविष्याची स्वप्न रंगवू शकेल असा जोडीदार निवडणं.
साधारण एका वर्षात ती शेवटची अपेक्षाही पूर्णत्वास आली. माझी आणि कुणालची भेट झाली. माझ्या बाबांच्या एका मित्राचे ते चिरंजीव. फोटो पाहून झाल्यावर आणि पत्रिका जुळल्यानंतर भेटायचं ठरलं. एकेदिवशी मुलाकडची मंडळी आली आमच्याकडे मला बघायला आले. आधी अशा बैठकांचं जाम टेन्शन यायचं. बोलायचं काय, करायचं काय, नीट काही माहिती नव्हतं. आई तर कधी सूचना देताना थकत नसे. पण थिअरी कितीही रटली तरी प्रॅक्टिकल मध्ये तारांबळ उडतेच. त्यात प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष, प्रत्येक कृतीचं दोन्ही बाजूंनी विश्लेषण ते वेगळंच. त्यामुळे भांबावून जायचे मी, पण आता एक वर्ष असे कार्यक्रम करून ती भीती गेली होती. आणि भीती गेल्यामुळे आपोआपच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या.
तर कुणाल, त्याचे आई-बाबा आणि बहिण मला बघायला आले होते. प्रथेचे चहा पोहे आणि प्रश्न झाल्यानंतर आम्हा दोघांना एकांतात बोलण्यासाठी आतल्या खोलीत पाठवलं गेलं. आता पहिल्या भेटीत, बाकीचे नातेवाईक समोर नसले तरी, एकांतात काय बोलणार दोन अनोळखी लोकं? एकमेकांच्या अपेक्षा-आकांक्षा, शौक-सवयी याबद्दल विचारणा झाली आणि आणखी एक-दोन जुजबी प्रश्नांनंतर शांतता पसरली. दोघांचाही 'कोटा' संपला होता.
शेवटी रूममधून निघायच्या आधी कुणाल म्हणाला, "हे बघ मानसी, असं एक-दोन भेटीत मला स्पष्ट काही सांगता येणार नाही. आय मीन आय लाईक यू, पण तुझ्याबरोबर आणखी थोडावेळ स्पेंड केल्याशिवाय, तुला आणखी थोडं जाणून घेतल्याशिवाय, मला कुठलाच निर्णय घेता येणार नाही. तुझं काय मत आहे याबद्दल?"
खरंतर मला पण ही धाकधूक होतीच. पण मी ती मनाच्या एका कोपर्यात डांबून ठेवली होती. दोन-तीन भेटीत, नातेवाईकांच्या माहितीवर, आपल्याला कमीत कमी मुलाची बेसिक आयडिया तर येईल. आणि मग भेटीदरम्यान आणखी थोडा अंदाज येईलच. पण तेवढ्यावर स्वभावाचा खराअंदाज येईल का याबद्दल शंका होतीच. कधी असंही वाटायचं की दोनदा भेटलं काय आणि दहा वेळा भेटलं काय माणसाच्या स्वभावाचा अंदाज लावणं कठीण. शेवटी या प्रश्नाचं उत्तर 'नशिबाच्या खेळ' ठरवून मी याबद्दल विचार करणं सोडून दिलं. पण तोच प्रश्न कुणालकडून ऐकून मला एकदम हलकं वाटलं. त्याच्या मताशी मी सहमती दाखवली आणि आम्ही आमचा निर्णय आमच्या आई वडिलांना कळवला. माझ्या आईवडिलांसाठी हे थोडं अनपेक्षितच होतं. त्यांच्या 'चवीत' बसणारा नव्हतं. पण माझं म्हणणं समजून, माझ्या मताचा विचार करत आणि आदर राखत त्यांनी मंजुरी दिली.
पुढचा महिना म्हणजे मनाला आवरण्याची कसरत होती. भावनांच्या रेशीमधाग्यावर चालणाऱ्या मनाचा तोल संभाळायचा होता. आम्ही चार-पाच वेळा भेटलो बाहेर 'डेट'वर. पहिल्या एक-दोन भेटी म्हणजे अगदी नाटकाच्या प्रयोगासारख्या होत्या - 'रिहर्स्ड'. ठरवून आलेले मुद्दे संपले की पुढे बोलणं कठीण व्हायचं. पण एकदा ते सुरुवातीचं अडखळलेपन गेल्यानंतर मात्र एक दुसऱ्यांच्या खऱ्या स्वभावाची थोडीफार ओळख होऊ लागली. आधी कुणी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड होता का इथपासून मला स्कुटी सुद्धा चालवता येत नाही इथपर्यंत सगळ्या गोष्टींवर आम्ही मनमोकळे बोललो.
दोघांनीही घरी पसंती सांगितल्यावर पुढचं काम घरच्यांनी त्यांच्याकडे घेतलं. मुहूर्त, कार्यालयाचं बुकिंग वगैरे पारंपरिक जबाबदाऱ्या त्यांनी त्यांच्याकडे घेतल्या. आम्हा दोघांकडे नवीन प्रथांचं डिपार्टमेंट दिलं गेलं होतं. प्री-वेडिंग फोटोशूट, मित्र-मैत्रिणींची राहण्याची व्यवस्था, डिजिटल आमंत्रनं, अगदी हनिमून डेस्टिनेशन सुद्धा. प्री-वेडिंग फोटोशूट सारखे खर्चिक सोहळे माझ्या तत्त्वात बसणारे नव्हते. कुणालचं म्हणणं होतं की एकदाच होणाऱ्या लग्नात हौस करणं काही चुकीचं नाहीए. मला त्याचं म्हणणं पटलं ही पण माझं त्याविषयीचे मत आणि भावना त्याला सांगितल्यावर आम्ही तो कार्यक्रम रद्द केला.
बघता बघता लग्नाआधीचे ते गुलाबी दिवस सरले. उद्या दुपारी मी आणि कुणाल लग्नाच्या रेशीमगाठीत कायमचे बांधले जाणार होतो. उद्याचा दिवस उजाडण्यासाठी आजची रात्र मात्र सरायला हवी होती. पण हृदयाच्या गतिमान ठोक्यांमुळे आजूबाजूचं सर्व काही संथ भासत होतं, अगदी ही रात्र सुद्धा. शेवटी आरशासमोरनं उठून मी झोपायला निघाले. हृदयाचे ठोके नियमित करण्याचा तोच एक उपाय होता.
पहाटेच उठल्यानंतर सगळ्यांची धावपळ सुरू झाली होती. आपापल्या नेमून दिलेल्या कामाला सगळेच लागले होते. बाबा सगळ्यांना सूचना देत होते. फोनवर फोन चालू होते त्यांचे. आई मधे मधे त्यांच्याकडून राहिलेल्या गोष्टींची त्यांना आठवण करून देत होती. या सगळ्या धांदलीत मी मात्र अनपेक्षितरीत्या शांत होते. सगळ्यांचं आवरून झाल्यावर आम्ही लग्नस्थळी पोहोचलो. सकाळचे नऊ वाजले होते. आम्ही सगळे तडक वधू कक्ष गाठला. थोड्याच वेळात मला पूजेसाठी तयार व्हायचे होते. साडी मेकअप वगैरे सगळं व्यवस्थित झाल्यावर, भटजींनी बोलल्यावर, मी स्टेजवर आले. लग्नाचा मुहूर्त १२:२२ चा असल्यामुळे या वेळेस बहुतेक खुर्च्या रिकाम्या होत्या. काही नातेवाईक, इकडे-तिकडे पळणारी बच्चेकंपनी, आणि मंगल कार्यालयाचे लोक सोडले तर फारसं कुणी नव्हतं.
सगळ्यात शेवटच्या खुर्च्यांवर चार जणांचा घोळका बसला होता. आली होती कंपनी म्हणजे शेवटी. मी त्यांच्याकडे बघते आहे हे बघून सगळ्यांनी हात वर केले - अगदी हजेरी लावल्यासारखी. भटजींसमोर मला काही मात्र तसं करता आलं नाही. मी नुसतं मानेने त्यांना प्रतिसाद दिला. पूजा संपल्यावर मी जाण्यासाठी उठले. तोपर्यंत आमचा ग्रुप स्टेजपाशी आला.
"अरे कधी आलात तुम्ही सगळे?"
"सकाळीच आलोय. आलो, हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि मग डायरेक्ट इथे" अभी बोलला.
"छान! बर झालं सगळे आलात. ग्रुपवर कुणी नीट रिप्लाय केला नाही येताय म्हणून. मला वाटलं बहुतेक नसेल जमत यायला यांना पुण्यावरून इथं, तेही वीकडेला."
"सरप्राइज देणार होतो आम्ही सगळे तुला." राकेश म्हणाला.
"माहितीये तुमचं सरप्राइज. स्वतःला सुद्धा दोन दिवस आधी माहीत नसेल की आपल्याला जायचंय का नाही."
"बरोबर ओळखलस मानसी तू. अभीने सगळं अरेंज केलं दोन दिवसात, गाडी, हॉटेल वगैरे. मग एक एक करत सगळे तयार झाले." गार्गी म्हणाली.
"अभी ग्रेटच आहे प्लानिंग मधे. थँक्यू अभी. पण आधीच सगळ्यांनी ठरवलं असतं तर हॉटेलचं मी अरेंज केलं असतं."
"आम्ही सगळे आलोय ते महत्त्वाचं. तुझ्या लग्नाच्या निमित्ताने आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यायला कारण भेटलं." गार्गी म्हणाली. "बाय द वे खूप सुंदर दिसतीएस तू." तीने पुस्ती जोडली.
"का रे तू एवढा गप्प का? पहिल्यांदा तुला ग्रुप मधे एवढं शांत बघितलंय मी." ऋषभ कडे बघत मी त्याला विचारले.
"खरंतर मी पण बोलणार होतो काही तरी पण नंतर विचार सोडून दिला."
"का रे बाबा? बोलण्याआधी एवढा विचार कधी पासून करायला लागलास तू?"
"तुझं लग्न आहे ना म्हणलं लग्नादिवशी तरी थोडं आवरावं स्वतःला."
"बरं राहू दे मग!"
पण बोलणार नाही तो ऋषभ कसला. "मला फक्त एकच विचारायचं होतं."
"काय?"
"मेकअपचं मटेरियल होलसेलमधे घेतलं होतं का? किती थर चढवलाय चेहऱ्यावर!" ऋषभचं बोलणं ऐकून सगळ्यांना हसू फुटलं. गार्गीने मात्र त्याला कोपरखळी दिली.
हा कधीच सुधरणार नव्हता. खरंतर मला पण तो मेकअप खूपच जास्त वाटत होता. पण माझ्या मेकअपचे निर्णय माझ्यापेक्षा माझी आई आणि त्या ब्युटी पार्लरवालीच्या हातात जास्त होते.
मला पुढच्या सोहळ्यांसाठी तयार व्हायचं होतं. सगळ्यांचा निरोप घेऊन मी परत वधू कक्षात आले. सगळ्यांना इथे आलेलं पाहून आनंद झाला होता. माझ्या आयुष्याचा एक छोटा पण खूप मोलाचा भाग म्हणजे आमचा तो ग्रुप होता. त्यातही ऋषभ आल्याने बरं वाटलं होतं. तो लग्नाला येईल का नाही याबद्दल थोडी शंकाच होती. साधारण दोन वर्षांपूर्वी जे काही घडलं त्याबद्दल मनात आजही कुठेतरी सल होती. तो इथं आल्यानं मनातली एक पुसटशी शंका नाहीशी झाली होती. आमची मैत्री जरी अगदी पहिल्यासारखी निखळ होती तरी कधी कधी वाटायचं की हे सगळे एक नाटक तर नाहीये ना. पण मग नंतर स्वतःला समजवायचे की ऋषभ चा अभिनय एवढा पण चांगला नाहीए. भूतकाळातल्या बऱ्या-वाईट आठवणींचं ते गाठोडं बाजुला ठेऊन मी भविष्याच्या तयारीला लागले.
पाटावर उभी असलेली मी मान वर करून अंतरपाटाच्या पलीकडचा कुणाल दिसतोय का ते बघण्यासाठी एकदा माझी नजर वर केली. पण दोन्हीकडून अंतरपट चांगलाच वर धरला गेला होता. फार सिरीयसली घेत होते लोकं त्यांचं काम. मंगलाष्टकांच्या प्रत्येक कडव्या गणिक अक्षतांचा वर्षाव होत होता. शेवटचं शुभमंगल सावधान ऐकलं आणि सगळीकडे ढोल ताशांचा आवाज घुमू लागला. आंतरपाट बाजूला झाला. दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे बघितलं आणि दोघांनाही त्याचं हसू आलं. एकमेकांना वरमला घालून झाल्या. दोघेही आमच्या आनंदात आता एकरूप झालो होतो. लग्नविधी आधी पाटावर चढलेली मानसी आता पाटावरून उतरताना एका नव्या जीवनात पाऊल टाकत होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा