भाग ७ - गार्गी

असह्य वेदना मला दुसरं काही सुचू देत नव्हत्या. पण तरीही कसंतरी सगळ्यांसमोर मी माझा 'ब्रेव्ह फेस' प्रेझेंट केला. माझ्यामुळे उगाच सगळ्यांचा मूड-ऑफ व्हायला नको म्हणून मी त्यांना राहिलेला गड फिरून येण्याचा आग्रह केला. पण मला कुणी सिरीयसलीच घेईना. सगळे माघारी जाण्याचं बोलू लागले. पण मी त्या जीप स्टॅन्ड पर्यंत कसं जाणार हा मोठा प्रश्न होता आणि हे कुणाच्या ध्यानीही येईना. मला नीट उभंही राहता येत नव्हतं, जीप स्टॅन्ड तर दूरच राहिलं. शेवटी ऋषभ ने सगळ्यांना समजावलं तेव्हा कुठे बाकी सगळे पुढे जाण्यासाठी राजी झाले. ऋषभ मला कंपनी देण्यासाठी माझ्याबरोबर थांबला.

"थँक यू माझ्याबरोबर इथे थांबण्यासाठी."
"अरे थँक यू कशाला? हे तर माझं कर्तव्यच आहे ना." ऋषभ मिश्किल हसत म्हणाला.
"थँक यू यार. तू चांगला फ्रेंड आहेस."
"अरे फ्रेंड्चं सोड, मी तुझा 'कूल सर' आहे ना... म्हणून कर्तव्य. फ्रेंडशिप तर कुणीही निभावतं."
"हो का? थँक यू मग सर."
"काय ग, असा कसा तुला एवढा मोठा खड्डा दिसला नाही?" त्या छोट्याश्या खळग्याकडे इशारा करत ऋषभ ने विचारलं.
"तो खड्डा एक तर छोटा आहे, आणि दुसरं म्हणजे आपण काही सारखं खाली बघून चालत नाही. त्यामुळे नाही दिसला तो खड्डा आणि पडला पाय त्यात."
"ह्म्म्म... खूपच दुखतंय का? चालता येईल तुला सगळे आल्यानंतर?"
"सिरियसली माहित नाही. स्प्रे मारल्यावर सगळं बधीर झालंय. आता पायावर वजन द्यायची पण भीती वाटतीए."
"डोन्ट वरी. उचलून घेऊन जाऊ तुला स्टॅन्ड पर्यंत. जिम ला जाण्याचा काहीतरी उपयोग होईल."
"मला पायी यायचंय खाली. मी कधीच ट्रेकिंग केलं नाहीए. म्हणलं सगळ्यांबरोबर असं एडवेंचर करायला मजा येईल. आय होप सगळे येईपर्यंत आय अॅम एबल टू वॉक."
"अगं कशाला एवढं टेन्शन घेतेएस. ट्रेकला परत येता येईल. आधी स्वतःला सांभाळ."
"माझ्या एकटीचा प्रश्न असता तर एवढं काही वाटलं नसतं. तू म्हणल्याप्रमाणे परत येता येईल. पण फॉर दोज हू वेर लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस त्यांचं वाईट वाटतंय."
"अरे ती लोकं पन्नास वेळा असं इकडे तिकडे भटकत असतात. तू नको टेन्शन घेऊस त्यांचं."
"बरं. बघू. इफ आय स्टील कान्ट वॉक व्हेन दे रिटर्न, तर मग आपण जीपने जाऊ... नाहीतर चालत."
"ओके. तू म्हणशील तसं करू."

पुढचा पाऊण तास आम्ही बरंच काही बोलूनही काहीच बोललो नसल्यासारखा गेला. बरेच जोक्स मारले गेले आणि त्यावर बरंच हसणंही झालं. टीममधल्या सगळ्यांच्या नकला आणि स्वभावविशेष मला कळाले. याआधी कधी ऋषभला असं मनमोकळं बोलताना पहिला नव्हतं मी. मला नेहमी थोडा अलिप्तच वाटायचा तो. असं नाही की तो जास्त बोलायचा नाही पण तो फार प्रॅक्टिकल बोलायचा, एकदम विषयाला धरून. आज मात्र त्याची वेगळीच बाजू पाहायला मिळत होती, फालतू बडबड करणारा, अशक्य अशा सिच्युएशन्स इमॅजिन करायला सांगून त्यावर विचित्र प्रश्न विचारणारा, दुसऱ्यांची (जास्त करून माझीच) उडवणारा आणि मी त्याच्यावर काही जोक मारला तर माझ्याएवढाच हसणारा.

मी मारलेल्या एका डायलॉग वर आम्ही हसत असतानाच आमचा ग्रुप परत आला. सगळ्यांनी कार्यक्रम थोडं लवकरच उरकला असावा माझ्यामुळे. पण अॅट लिस्ट ते फिरून आले  त्यामुळे एवढं गिल्टी वाटत नव्हतं मला. आता मात्र खरी परीक्षेची घडी आली होती. मनातल्या मनात मी आशा करत होते की मी चालू शकेल. मी उठून पहिलं पाऊल टाकलं आणि खूष झाले. मला वाटलं होतं त्यापेक्षा बरंच कमी दुखत होतं. ऋषभने सपोर्टसाठी माझा हात धरला होता. तसं मला एकटीला चालता आलं असतं पण मला उगाचच रिस्क ही घ्यायची नव्हती. आणि ऋषभचा हात हातात असण्याने काही वाईटही वाटत नव्हतंच!

"गार्गी , बसून बसून बोर झाली असशील ना तू?" मानसीने मला विचारलं.
"नाही. बोर नाही झाले. ऋषभ होता सोबत सो चांगली एंटरटेनमेंट झाली."
"अरेरे! मग तर आणखीच बोर झाली असशील तू त्याचे PJ ऐकून ऐकून." मानसीच्या वाक्यावर ग्रुपमध्ये हशा पिकला.
"अरे PJ का असेना, महत्त्वाचं काय आहे, माणूस एंटरटेन झाला पाहिजे. अँड यू वेर थरोली एन्टरटेन्ड, हो का नाही गार्गी?"
"येस आय टोटली ऍग्री. बिलकुल बोर झालं नाही मला."
"ते सगळं ठीक आहे. पण काय रे ऋष्या? थरोली एन्टरटेन्ड? एवढं खतरनाक इंग्लिश? तेही तासाभरात?" राकेशने ऋषभची खेचण्यासाठी विचारलं.
"गार्गी मॅडमचा प्रभाव आहे!" ऋषभने ओशाळत माझ्याकडे बघितलं, "ती एवढ्या उच्च प्रतीचं इंग्लिश बोलते की आमच्यासारख्यांची पण सुधारते थोडी. संगतीचा असर. दुसरं काय?"
हे ऐकून मी थोडी सर्प्राईज्ड झाले. राकेशचा टोला ऋषभने माझ्याकडे वळवला होता. मला वाटलं नव्हतं तो असं करेल. मी थोडं तावातच बोलले, "मी लहानपणापासूनच तसं बोलते. पूर्ण शिक्षण इंग्लिश मीडियम मधे झाल्यानंतर ते थोडं सहाजिकच आहे. कधी कधी नाही सुचत एखादा मराठी शब्द पटकन तर मी वापरते इंग्लिश त्याच्या जागी. त्यामुळे कुणाला काही प्रॉब्लेम होण्यासारखं नाहीए आणि असला तरी मला काही फरक पडत नाही."
मला माहित होतं ऋषभ माझी उडवतोय. मी पण जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा एवढं फोर्सफुली बोलायचं नव्हतं मला. पण बोलता बोलता मी कधी सिरीयल झाले कळलंच नाही. माझ्या बोलन्यानंतर ग्रुपमधे अवघड शांतता पसरली.
"अगं तू या दोन गाढवांच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस. उगाच काहीतरी बोलत बसतात." मानसी परिस्थिती सावरत म्हणाली.
"मी तर फक्त ऋषभची खेचत होतो. यालाच अक्कल नाहीए कधी कुणाशी काय बोलावं याची." राकेश ऋषभला  खोटं दटावत म्हणाला.
मलाही आता माझ्या बोलण्याचं थोडं वाईट वाटत होतं.
मग ऋषभ म्हणाला, "अगं मी तर असंच चिडवत होतो तुला. आतापर्यंत तुला एवढं तर नक्कीच कळलं असावं की माझ्या बोलण्याला कधीच सिरीयसली घ्यायचं नसतं. मानसीला बघ चांगला अनुभव आहे."
"सॉरी गाईज! मला पण ऍक्च्युली एवढं हार्षली बोलायचं नव्हतं, पण तुमच्या लेव्हलची टिंगल-टवाळी अजून मला नीट जमत नाही."
"शिकवू आम्ही तुला. तू टेन्शन नको घेऊस. माझा तर 'एरिया ऑफ एक्सपर्टीज' आहे तो." ऋषभ म्हणाला.
"हे मात्र एकदम खरंय" मानसी म्हणाली.
यावर सगळेच हसले. काही क्षणांपूर्वीची टेन्स सिच्युएशन त्यामुळे निवळली.

गड उतरायची पायवाट आता जवळ आली होती. मी सगळ्यांना आग्रह केला की पायीच गड उतरायचा. मला आता बऱ्यापैकी चालता येत होतं. पण बाकीच्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना जास्त कॉन्फिडन्स नव्हता माझ्या चालण्यात हे कळत होतं. बरंच हो-नाही झाल्यानंतर शेवटी सगळे गड पायी उतरायला तयार झाले. मला वाटलं त्यापेक्षा गड उतरणं बरंच अवघड होतं. ज्यांना नीट चालता होतं त्यांचे पाय पण कधीकधी घसरत होते. त्यांना पाहून 'तेरा क्या होगा कालिया' असा प्रश्न मला पडला. पण ऋषभ होता मदतीला. आम्ही दोघं सगळ्यांच्या मागून येत होतो. ऋषभ दोन पावलं माझ्या पुढे चालत होता. मला उतरणं अवघड वाटलं की तो खालून हात पुढे करायचा. मग त्याचा हात पकडून मी खाली उतरायचे. सुरुवातीला माझ्याबद्दल चिंतेत असणारे बाकीचे आता काहीसे निश्चिंत झाले होते. त्यामुळे थोड्याच वेळात प्रत्येक जण आपापल्या गतीने गड उतरत होता. कुणी जास्तच पुढे गेलं की बाकीचे येईपर्यंत ते एके ठिकाणी थांबायचे. मग सगळेच तिकडे पोचले की परत खाली प्रस्थान चालू. एवढ्या वेळ गप्पा मारणारे सगळे गड उतरताना मात्र बऱ्यापैकी शांत झाले होते. सांजवेळ झाली नसली तरी ऊन केव्हाच उतरणीला लागलं होतं. सकाळपासूनची चंचलता आता स्थिरावली होती. वाऱ्याची एखादी झुळूक सोडली तर आजूबाजूची हवा ही स्तब्धच होती. मला तर उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर मामाच्या गावाहून परतन्यासारखं वाटत होतं. महिनाभर मजेत गेलेल्या दिवसांचा त्या दिवशी अंत होणार असतो. सगळे मावस भाऊ बहीण, मित्र-मैत्रिणी निरोपासाठी आलेले असतात. आपल्या माणसांना सोडून जाताना मनी जाणवणारा जडपणा मला आताही जाणवत होता. पण या दडपणाचं कारण मात्र नक्की सांगता येत नव्हतं. आपण नक्की कशाला सोडून जात आहोत हे उमगत नव्हतं. हा गड, या गडावरच्या आजच्या आठवणी, सोबत असणारी ही माणसं, हे सगळे उद्यापण असणारच आहेत. मग ही मनात पोकळी कशासाठी?

साधारण तासाभरात आम्ही पायथा गाठला. मला तर स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. आयुष्यातला पहिला ट्रेकिंगचा अनुभव संस्मरणीय झाला होता. माझ्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसत असावा.
"का ग, एवढा का चेहरा खुललाय तुझा? काय विचार करतीएस?" ऋषभने विचारलं.
"खूप खुश आहे मी गड उतरल्याबद्दल. आय रिअली वॉन्टेड टू अकॉम्प्लिश दीस आणि आता माघारी वळून मी जेव्हा बघते की मी कुठून सुरुवात केली होती आणि आता कुठे आहे, एकदम भारी वाटतंय."
"हो. आय नो हाव यू फील. माझी तर ही पहिली वेळ नाहीयए पण अजूनही मला गड चढल्यावर किंवा उतरल्यावर तेवढाच आनंद होतो. आणि नुसता आनंदच नसतो, त्याबरोबर तू म्हणल्याप्रमाणे एक 'सेन्स ऑफ अचिव्हमेंट' पण असते. असं वाटतं की इतिहासाच्या पाऊलखुणांवरनं आपण चाललोय. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या माणसाच्या कर्तुत्वाला नमस्कार करतोय."
ऋषभएवढं डीप फिलोसोफिकल बोलणं मला नाही जमत, पण त्याचे शब्द ऐकले आणि मला जे आता वाटतंय ते बरोबर त्याने शब्दबंध केलंय असं वाटलं.
"आणि थँक्स अ लॉट तुला. तुझ्याशिवाय मला नाही वाटत मी हे करू शकले असते..."
मला तोडत ऋषभ म्हणाला, "मी तुला मदत केली म्हणतेस ना ज्यामुळे तुला एवढं भारी वाटतंय, मला या बदल्यात दोन गोष्टी हव्यात तुझ्याकडनं ...", तो माझ्या विचारण्याची वाट पाहत थांबला.
शेवटी मी विचारले, "कुठल्या दोन गोष्टी?"
"पहिली - हे असं पन्नास वेळा थँक यू नको म्हणत जाऊस. आपण चांगले मित्र आहोत, म्हणजे निदान मी तरी तसं मानतो. हे थँक यू, वेलकम वगैरे ऐकलं की एकदम मैत्रीवर कचरा टाकल्यासारखं वाटतं." ऋषभ बोलायचा थांबला.
"ओके. इथून पुढे नो थँक यू, नो वेलकम. बाय द वे, मैत्रीत सॉरी पण नाही चालत ना?"
"नाही सॉरी चालेल. इनफॅक्ट त्याचा बऱ्याच वेळा वापर करावा लागेल. तेही मलाच. सो सॉरी इज अलौड."
 "बरं, मग दुसरी गोष्ट कुठली?"
"दुसरी एकदम महत्त्वाची गोष्ट...", थोडं थांबून सस्पेन्स वाढवत ऋषभ म्हणाला, "इथून पुढं मला अजिबात 'सर' म्हणायचं नाही."
एकदम काहीतरी महत्त्वाचं बोलेल हा असं समजून मी कान देऊन ऐकत होते पण त्याचं ते वाक्य ऐकून एकदम हसू आलं मला.
"ओके सर, आतापासून नो सर."
"जमतय मग."

सगळेजण सकाळच्या दुकानावर चहासाठी जमले. चहा घेऊन झाल्यावर सगळे बस स्टॉप वर आले. गडावरून परतणाऱ्यांची बरीच गर्दी जमली होती. बस आल्यावर मी माझ्या दुखत्या पायाने बसमधे एवढ्या गर्दीत कशी चढणार यासाठी ऋषभ मला त्याचा प्लान सांगत होता. ग्रुपमधला जो कुणी आधी जाईल तो कमीत कमी माझ्यासाठी एक जागा पकडेल असं आमचं ठरलं. थोड्यावेळात बस स्टॉप वर आली. मी आणि ऋषभ थोडं मागं, गर्दीपासून वेगळे थांबलो होतो. बस रिव्हर्स करत करत मागे येत होती. सगळ्यांच्या अंदाजापेक्षा बस थोडी जास्तच मागे येऊन थांबली. जेव्हा बसचा दरवाजा उघडला तेव्हा योगायोगाने मी आणि ऋषभ एकदम दारासमोर उभे होतो. पायाला कुणाचा धक्का लागू नये म्हणून मुद्दामच आम्ही मागे थांबलो होतो, पण आता बस आमच्या समोर येऊन उभी राहिल्यावर सगळी गर्दी आमच्याकडे धावत होती. त्याच्या चेहऱ्यावरचं कन्फ्युजन मला स्पष्ट दिसत होतं - या वेड्या गर्दीला आधी जाऊ द्यायचं का काही क्षणात होणाऱ्या धक्काबुक्कीला सामोरं जायचं? त्याचा निर्णय पक्का व्हायच्या आधीच मी पटकन बसमधे चढले, दुखणारं पाऊल पहिलं पुढे टाकत! ऋषभ पण मग लगेच चढला. त्याच वेळी गर्दीनेही दरवाजा गाठला होता. मी बसच्या मधे एक सीटवर जाऊन बसले, आणि मागे वळून ऋषभला हात केला. लगेच माझ्याकडे येत त्याने त्याची जागा घेतली. पुढच्या दोन सेकंदात बस खचाखच भरली. मागच्या सीटवर ग्रुप मधल्या काही जणांना जागा मिळाली होती तर काही तिकडेच उभे होते. अभीने  सगळ्यांना आवाज देत सगळे आलेत याची खात्री करून घेतली. तिकीट काढण्याची जबाबदारी पाहिल्यासारखीच त्याने घेतली. पाच मिनिटात बस चालू झाली आणि आमचा प्रवास जिथून चालू झाला होता त्याच शनिवारवाड्याकडे आम्ही निघालो.

"खतरनाक आहेस ग तू. कशी चढलीस बसमधे तू पटकन, कुणी म्हणणार पण नाही की या मुलीचा पाय मुरगळला होता म्हणून." ऋषभ म्हणाला.
"अरे चालून आलेली अशी संधी कशी सोडू मी. आणि जागा नसती मिळाली तर उभं राहणं अलमोस्ट अशक्य होतं. म्हणून घेतली रिस्क - कॅलक्युलेटेड रिस्क."
"आपल्यापैकी कुणीही पकडली असती जागा तुझ्यासाठी. तुला असं थोडीच उभं राहू दिलं असतं आम्ही."
"हो माहितीए मला. पण मला नाही आवडत कुणावर डिपेंडंट रहायला. किंवा माझ्यामुळे उगाच कुणाला त्रास झालेला."
"मला पण नाही आवडत मोस्टली. पण मी तुझ्याएवढा तत्त्ववादी पण नाहीए. माझा पाय मुरगळला असता तर मी तर खुशाल कोणालातरी उठायला सांगितलं असतं. अगदी तुला पण." ऋषभ हसत म्हणाला.
"आणि मी पण दुसऱ्या कुणासाठीही उठले असते, पण तुला तसंच ताटकळत ठेवलं असतं."
"म्हणजे मला वाटलं तेवढ्या पण चांगल्या स्वभावाची नाहीएस तू. गुड टू नो."
"चांगल्या लोकांसाठी मी चांगलीच वागते. आता पुढचाच माणूस चांगला नाही त्याला मी काय करू?"
ऋषभकडे बघितलं आणि दोघेही हसायला लागलो. थोडा वेळ असंच काहीतरी बोलण्यात गेला. सांजवेळ होत आली होती. आम्ही दोघेपण आकाशात उधळलेल्या रंगांकडे बघण्यात मश्गुल झालो. खिडकीबाहेर दिसणारं ते चित्र लहानपणी बऱ्याच वेळा रेखाटलं होतं मी - डोंगरामागे जाणारा सूर्य, आभाळातला नारंगी रंग, आणि घरट्याकडे परतणारे पक्षी. बसही आता एकदम तालात चालली होती. खिडकीतनं येणारा वारा कानात अंगाई गीत गात होता. दिवसभराचा क्षीण आता जाणवायला लागला होता.
"तुला झोपायचं असेल तर निवांत झोप. उठवेल मी तुला स्टॉप आल्यावर."
"हो. खूप झोप येतीए. झोपते मी थोडा वेळ. तू मात्र झोपू नकोस नाहीतर इथेच राहू आपण दोघं."
"नाही गं. तुला उठवण्याची जबाबदारी असल्यावर कसा झोपेल मी? आणि झोपलो जरी तरी बाकीचे आहेतच आपल्याला उठवायला. त्यामुळे निवांत झोप तू."
सीटवर मागे रेलत मी डोळे मिटले. झोप हळूहळू चढत होती. पण त्या स्थितीत मी कम्फर्टेबल नव्हते. मान इकडे नाही तर तिकडे जायची आणि तोल गेल्याने झोप मोडायची. शेवटी मग ऋषभच्या खांद्यावरती डोकं ठेवून मी डोळे मिटले. ऋषभही थोडा आणखी सरळ बसला, मला जास्त झुकावं लागू नये म्हणून.

डोक्यातले सगळे विचार हळूहळू झोपेच्या स्वाधीन होऊ लागले. निद्रेच्या काळोखात हरवणारा शेवटचा विचार ऋषभबद्दलचा होता. जाता जाता तो माझ्या ओठांवर एक स्मित उमटवून गेला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १० - ऋषभ

भाग ५ - गार्गी

भाग ८ - मानसी