भाग १ - ऋषभ

रेस्टॉरेंट मधे पोहोचून अर्धा तास होत आला होता. तसं मला वेळेआधी येण्याची सवयच आहे. पण सध्या तरी ही सवय मला चांगलीच महागात पडत होती कारण बसल्या बसल्या काय करायचे म्हणून मी (कोल्ड) ड्रिंक रिचवत होतो. कोल्ड ड्रिंक घेण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्या दिवसानंतर आज आम्ही - म्हणजे ती आणि मी (आजच्या जमान्यात 'ती' आधीच स्पष्टपणे सांगावं लागतं माहीतर उगाच 'दोस्ताना' होते) - पहिल्यांदा भेटणार होतो.

आता 'तो' दिवस तसा बहुतेकांच्या आयुष्यात येतो आणि तो प्रत्येकासाठी अविस्मरणीय असतो. कुणासाठी तो त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात आनंददायी दिवस असतो तर कुणासाठी इंजीनीयर होऊन कॉल सेंटर मधे काम करण्यापेक्षाही भयानक असतो. अजून तरी 'ती' काही इतक्यात येण्याची शक्यता नाहीए म्हणून तोवर मी माझ्या 'त्या' दिवसाबद्दल थोडं सांगतो.

तसं माझ्या गोष्टीत नवीन असं काही नाहीए. आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो. काम करता करता मैत्री झाली. मैत्री जास्त घट्ट झाली आणि मला ती आवडायला लागली. आता आवडते तर खरं पण सांगावं कसं हे काही कळेना. सरळ तोंडावर सांगावं तर चार - चौघात आपल्या कानाखाली बसायची आणि आपल्याला तोंड दाखवायची जागा उरायची नाही या भीतीपायी मी तीला एक पत्र - प्रेमपत्र - लिहीलं. नंतर एका बागेत भेटण्यासाठी बोलवलं. बागेत एकांताची जागा शोधून तिला मी ते पत्र दिलं. ती पत्र उघडून वाचायला लागली आणि मी हळूच तिच्या एका हाताच्या अंतरापार जाऊन उभा राहीलो. तिची नजर शब्दांवरून फिरत होती, तसे तिचे भाव बदलत होते. इकडे माझ्या हृदयाचे ठोके 'स्लो मोशन' मधे पडत होते. तिने पत्र वाचले आणि माझ्याकडे बघितले. तिच्या डोळ्यांत बघताच मला कळाले की आपले 'बारा वाजले'. तिच्या ओठांवर जरी एक अवघडसे स्मित होते, तरी तिच्या डोळ्यांतला नकार मला स्पष्टपणे दिसत होता.

दोघांनाही पुढे काय बोलावे, काय करावे, काही कळत नव्हतं. मग मीच म्हणालो 'चल एक चहा घेऊ' आणि आम्ही आमच्या नेहमीच्याच टपरीकडे निघालो. बागेतून बाहेर पडताना तिने माझ्या हातात ते पत्र दिले. ते पत्र जरी शाबूत होतं तरी माझ्या हदयाचे झालेले तुकडे मी आतल्याआत वेचायचा प्रयत्न करत होतो. दोघांनीही चहा घेतला आणि आम्ही आपआपल्या वाटेला लागलो. निघताना ना ती काय म्हणाली ना मी तिला काही विचारले. दोघंही त्या धक्क्यातून अजून काही सावरलो नव्हतो.

घरी पोहोचलो, काय करावं काही कळत नव्हतं. पिंजऱ्यात बंद असलेल्या गाढवासारखं (त्यावेळी गढवासारखं वाटत होतं) येरझाऱ्या घालत होतो. शेवटी मनावर कायमचं बिंबावलेल्या त्या प्रसंगाला विसरण्यासाठी मी ती गोष्ट घ्यायची ठरवली जी मी सहसा दुपारी कधी घेत नाही...
...झोप.

आज एक आठवडा झाला त्या दिवसाला. मनातलं वादळ बरच शांत झालं होतं. ऑफिसमधे जरी पहिल्यासारखे मोकळेपणाने बोलत नसलो तरी हाय-बाय होत होतं. काल तिचा मेसेज आला भेटण्यासाठी, मलाही बोलायचं होतंच म्हणून मी इथे आहे पण ही कुठे तडमडलीए काय माहीत.

आणखी पंधरा मिनिटांनंतर मला तिचे दर्शन झाले. नेहमीच साध्या कंपड्यांत वावरणारी ती आजही तशीच आली होती. साधा सलवार-कमीज, दुपट्टा आणि त्याबरोबर या पन्नास गोष्टी मुलींबरोबर असतात त्या; उदाहरणार्थ - पर्स, स्कार्फ इ. इ. तिच्या ह्या साधेपणावरच तर मी भाळलो होतो. क्षणभरासाठी मनामधे एक कळ उठली पण स्वतःला सावरत मी उभा राहिलो. हाय-हॅलो होऊन ती बसल्यावर मी तिला विचारले "काय घेणार?"
टेबलावर ठेवलेला मेनूकार्ड उचलून तिने त्यावर एक कटाक्ष टाकला. तिचं एक सँडविच आणि कोल्ड कॉफी ठरल्यानंतर तिने मला विचारले "तू काय घेतोएस?"
तसं तर एवढे पेले रिचवल्यावर आणखी काही पोटात ढकलण्याची इच्छा नव्हती पण कंपनी म्हणून मी पण एक कोल्ड कॉफी सांगितली.
"काय मग? आज दुपारी जेवली नाहीस वाटतं?" मी विचारले.
तिने प्रश्नार्थक मुद्रेने पाहत विचारले "का?"
"आज चक्क कॉफी बरोबर सॅंडविच? जाम भूक लागलेले दिसतीए तुला. बघ हा, उगाच जास्त होईल." मी हसत म्हणालो.
"खाईल मी. आणि तू काय डाएटिंग वर आहेस का? फक्त कोल्ड कॉफी? एरवी तर बकासुरासारखा खात असतोस."
"तुझी वाट बघत बघत एवढं कोल्ड्रिंक पिलोय की पोटात कोयनासागर झालाय माझ्या."
आमच्या नेहमीच्या 'तू-तू - मैं-मैं' ला आज परत एका आठवड्याने वाट मिळाली होती. असं वाटलं जसं काही झालंच नाहीए. आम्ही अजून पूर्वीचेच ऋषभ-मानसी आहोत. ही आमची नावं - आधी सांगायचं राहून गेलं. दोघांचंही हसणं ओसरलं तसं मागच्या काही दिवसांचं ओझं परत जाणवायला लागलं. काहीतरी बोलायचं म्हणून मी तिला विचारलं - "ऑफिसचं काम कसं चाललंय?"
हे विचारलं आणि मनात आलं - 'गाढवा एकाच टीममधे ना दोघं? मग असं जगावेगळं काय करणार ती जे तुला माहिती नाहीए?'
"काही नाही... तो डिफेक्ट लॉग केला अर्जेंटिनाचा... त्याचं अॅग्रीमेंट चुकीचं..."
मी तिकडेच तिला म्यूट वर टाकलं. डोक्यात सहजच विचार आला की 'च्यामारी हे पिक्चर मधे वेटर बरोबर टायमावर एन्ट्री मारतात. आता गरज आहे खऱ्या आयुष्यात तर कुठे गेलेत तडमडायला काय माहित?'
"...मग मायकलशी कॉल झाला. तू होताच तेव्हा." तिचं (सं) भाषण संपलं होतं.
'तू' ऐकू आल्यावर मी तिच्या बोलण्याकडं लक्ष दिलं.
"हो होतो ना... बघू आता काय होतंय ते..." मी म्हणालो.
तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या वेटरला बोलवत त्याला ऑर्डरबद्दल विचारलं. "बघतो" म्हणून तो निघून गेला. मनात चार शिव्या हासडल्या त्याला कारण आता आणखी काय बोलायचं हे कळत नव्हतं.

"ऋषभ तुला मी आज का बोलावलं भेटायला याची तुला थोडी कल्पना असेलच..."
"हो, कल्पना तर आहे पण नक्की कशासाठी हे नाही कळतए. म्हणजे दोघांनाही एकमेकांच्या भावना माहितीएत मग आज भेटून काय साध्य होणारे?"
"हे बघ ऋषभ तू माझा खूप चांगला मित्र आहेस..."
'हीच तर गोची आहे' मी मनात म्हटलं.
"...आणि तू त्या दिवशी अचानक असं पत्र दिलंस वाचायला. माझ्याबद्दल तुला असं काही वाटतं याचा मला थांगपत्ताही नव्हता. तुझ्याबद्दल मी तसा कधी विचार केला नव्हता आणि तुला 'नाही' कसं म्हणावं हेही मला सुचत नव्हतं." ती हे सगळं सांगत असताना वेटर ऑर्डर घेऊन आला होता. त्याच्याकडे तिखट नजरेने बघत मी मनातल्या मनात म्हणले - "ये xxxx. तुला पण हीच वेळ मिळाली होती ऑर्डर सर्व करायला. मगापासून कुठे गेला होता xxxx. तुझीच कमी राहिली होती xxxx."
तोवर मानसी पुढे बोलत होती - "एक आठवडा झाला पण तुझ्याशी बोलायची हिम्मत होत नव्हती. खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. म्हणून म्हणलं आज एकदाचं भेटून काय सोक्षमोक्ष लावायचा तो लावून टाकू."

तिच्यासाठी बहुतेक 'एकदाचं सोक्षमोक्ष लावणं' सोपं होतं. अर्थात हा तिचा दोष नाहीए. कितीही प्रयत्न केले तरी मनावर ताबा ठेवणे कठीण. माझ्या मनाने वर्तमानाचा पाया नसतानाही भविष्याचे उंच उंच मनोरे बांधले होते. त्यादिवशी तिच्या नुसत्या नजरेतल्या भावाने ते पार जमीनदोस्त झाले होते.
"हे बघ मानसी तू जरी मला 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे कळण्याइतपत ओळखत नसलीस तरी तू अशा फार थोड्या लोकांमध्ये मोडतेस जे मला बऱ्यापैकी जाणतात. मी फार प्रॅक्टिकल माणूस आहे. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणल्यावर त्यावर रडत बसणं हा माझा स्वभाव नाही. पण तू जसं 'एकदाच सोक्षमोक्ष लावू' असं म्हणतीएस तसं एकदम मला जमणार नाही. हे सगळे प्रकरण झाल्यानंतरही तू स्वतःहून आपल्या मैत्रीत तडा जायला नको म्हणून माझ्याशी बोलायचं ठरवलंस यानी निदान आपली मैत्री तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे समजतंय मला. तुझ्या नकाराची मी कदर करतो. मला फक्त थोडा वेळ हवाय. हळूहळू तुला तुझा पूर्वीचाच मित्र ऋषभ दिसायला लागेल."
"मघापासून केवढा गप्प-गप्प होता आणि आता अचानक ही शब्दगंगा कुठून अवतरली?" वातावरण हलकं करण्याच्या प्रयत्नात मानसी म्हणाली.
"काही नाही ग जवळपास कुठे वेटर दिसत नव्हता म्हणून..."
"काय?" तिला नाही झेपलं.
"काही नाही. सोड. झालं का तुझं खाऊन? काही मागवायचंय का अजून? भूक असेल अजून तर एखाद किलोची पेस्ट्री वगैरे मागवायची आहे का तुला?"
"मागवते, पैसे तू भरणार का?" तिने उलटप्रश्न केला.
"भरले असते; पण तूच नकार दिलास..." शब्द सावरायच्या आधीच मी हलक्या आवाजात बोलून गेलो.
तिने चमकून माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना मला स्पष्ट दिसल्या. जेवढा मी आतून होरपळत होतो तेवढाच दाह तिला पण होत होता.
"सॉरी!" मी मनापासून म्हणालो.
हलकेच हसून ती म्हणाली - "चल निघू." पार्किंग मधे आल्यावर तिने तिच्या चेहर्‍याला त्या स्टोलमधे गुरफाटलं. एखाद्या आतंकवादी मासिकाची पोस्टर गर्ल वाटत होती ती.
"उद्या काही नवीन टीम मेंबर्स जॉईन होणारेत टीम मधे आपल्या. त्यांची KT घ्यायची आहे आपल्याला. तू डॉक्युमेंट्स तयार केलेत का?"
"शीट! ते उद्या आहे का? मी तर काही केलं नाहीए."
"मला वाटलंच विसरला असशील तू. जाऊदे, उद्या थोडं लवकर येऊन ऑफिसमधेच तयार कर."
"हा, तेच करावं लागेल आता. नाही केलं तर तो ह****** आयुष आहेच डोकं खायला. टीम लीडर कमी आणि हिटलरचं कारटंच जास्त शोभतो तो. एकदा पूर्ण नाव विचारलं पाहिजे त्याला."
"विचार त्याला उद्या तूच. चल निघते मी. बाय."
"बाय."

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिच्याबरोबर बघितलेल्या भविष्याला पण मी बाय केला.
कायमचा बाय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १० - ऋषभ

भाग ५ - गार्गी

भाग ८ - मानसी