भाग ९ - गार्गी
मानसीच्या लग्नाची बातमी ग्रुप वर धडकल्यानंतर सगळ्यांनी तिला काँग्रॅच्युलेशन केलं. मी पण माझे दोन शब्द टाकले. नंतर तिने जेव्हा इन्व्हिटेशन कार्ड चा फोटो टाकला तेव्हा परत एकदा काँग्रॅच्युलेशन्स राउंड झाला. मला वाटलं होतं की लग्नाला कोल्हापूरला जाण्याचा सगळ्यांचा काही तरी बेत ठरेल पण तसं काही घडलं नाही. आता पहिल्यासारखा ग्रुप काही ॲक्टिव नव्हता. दोन वर्षात बरच काही बदललं होतं, बरच काही सांगायचं राहून गेलं होतं.
सिंहगडच्या ट्रेक नंतर मला ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं - व्हाट्सअप आणि ऑफिस दोन्हीकडे. जेवायला तरी मी अजूनही माझ्या आधीच्या मैत्रिणींबरोबर जात असले तरी ऑफिसमध्ये माझं स्टेटस आता प्रेशर राहिलं नव्हतं. सगळ्यांबरोबर संध्याकाळच्या चहाला जाणं, एकमेकांची थट्टा-मस्करी करत राहणे, गरज पडली तर दुसऱ्याची मदत करण्यासाठी स्वतःचं काम बाजूला ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं - आयुषला शिव्या देणे हे माझ्या हळूहळू अंगवळणी पडलं होतं.
ग्रुपचा हिस्सा झाल्यापासून ऋषभशीही बोलणं वाढलं होतं. त्या संध्याकाळी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपताना मनाच्या पटलावर उमटलेल्या भावनांची एक अस्पष्ट आठवण पुढचा महिनाभर मला सतावत होती. एरवी जे माझ्या मनात असतं तेच ओठांवरही असतं. पण ऋषभच्या बाबतीत मनाचा काही नेम लागत नव्हता. काही दिवस असे असायचे की तो आजूबाजूला असला, माझ्याशी बोलत असला की पूर्ण जगाचा विसर पडायचा. तर कधी कधी तो नुसता एक मित्र म्हणूनच बरा वाटायचा. मुळात ऋषभ माझ्या 'टाईप'चा नव्हता. पण त्याचे काही पैलू इतके वेगळे आणि रिफ्रेशिंग होते की नकळत त्याच्याबद्दल मी विचार करायला लागायचे. शिवाय कितीही वेळ आम्ही एकमेकांबरोबर घालवला, कितीही व्हाट्सअप वर चॅट केलं तरी ते सगळं 'प्लटॉनिक' होतं. ऍटलिस्ट त्याच्याकडं तरी. मुलं जेव्हा एखाद्या मुलीच्या मागे लागतात तेव्हा ते कळतं लगेच त्यांना. पण ऋषभ कडणं कधी मला तसे सिग्नल्स भेटले नाहीत. आणि माझं पण नक्की काय ठरत होतं ऋषभबद्दल. क्रश होतं पण प्रेम? माझं मलाच माहित नव्हतं.
ऋषभशी जशी माझी केमिस्ट्री जुळली होती तशीच त्याची मानसीशीही चांगली केमिस्ट्री होती. मी जेव्हा जॉईन झाले होते तेव्हा पण दोघं बोलायचे पण ते अताइतकं सहज नव्हतं. बोलता-बोलता कधीकधी दोघेही शांत व्हायचे पण माझी जशी मैत्री वाढत गेली तसेच त्याची आणि मानसीची मैत्रीही वाढत गेली. मला कधी कधी वाटायचं की दोघांचं काहीतरी चाललंय की काय. त्यामुळे मी पण ऋषभ विषयीच्या माझ्या भावनांना आवरायचे. उगाच नंतर मनस्ताप होण्यापेक्षा आधीच मनाला आवर घातलेला बरा.
महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझी नाईट शिफ्ट असायची. सोबत ऋषभ आणि आयुष होते टीममधनं. आयुषचा आणि ऋषभ चा ३६ चा आकडा असल्यामुळे आम्ही दोघं सेपरेट जायचो रात्री जेवायला कॅफेटेरियात. जेवण झालं की थोडा वेळ बाहेरच असलेल्या ओपन एअर थिएटर च्या पायऱ्यांवर बसायचो. बाजूच्या बागेत लावलेल्या रातराणीचा मोहक सुगंध दरवळत असायचा. काम जास्त नसलं की चांगल्या गप्पा रंगायच्या आमच्या तिथे. एकदा असाच विषय निघाला तर मग मी त्याला त्याच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल विचारलं. त्याने त्यावरही जोक मारत तो सिंगल असल्याचं सांगितलं. रिलेशनशिप्स या विषयावर आणखी थोडं बोलणं झाल्यावर आम्ही परत ओडिसी कडे परतलो. परतताना मनाला घातलेला आवर सुटू पाहत होता.
हळूहळू मी ऋषभशी फ्लर्ट करू लागले. 'आय अॅम इंटरेस्टेड इन हिम' असे सिग्नल्स त्याला देऊ लागले. तोही फ्लर्ट करायचा इन रिटर्न. पण एका लिमिट पर्यंतच. त्याच्या डोक्यात जणू काही फ्लर्टींग ची क्वांटिटी आणि क्वालिटी ठरलेली होती. विषय थोडा जास्तच सिरीयस होतोय असं वाटायला लागलं त्याला की तो चलाखीने विषय बदलायचा. आमची ही जुगलबंदी आवडायची मला. ऋषभ काही एवढाही वेडा नव्हता की मला त्याच्या विषयी काय वाटते याचा त्याला आतापर्यंत अंदाज आलेला नसावा. मलाही त्यामुळे कळलं होतं की 'ही इज नॉट इंटरेस्टेड इन मी' ऍटलिस्ट रोमँटिकली तरी. पण मेंदूला जरी या गोष्टी कळल्या तरी मनाला कळायला वेळ लागतो. त्यामुळे अधेमधे आमचं फ्लर्टिंग चालायचंच. पुढचे काही महिने असेच तळ्यात-मळ्यात गेले.
एके दिवशी ऋषभने सगळ्यांना संध्याकाळच्या चहासाठी मेसेज केला. संध्याकाळी तसा सगळाच ग्रुप जायचा चहाला. एक जण उठला की सगळे जॉईन व्हायचे. पण ऋषभने आज ऑफिस च्या चॅटवर विशेष करून सगळ्यांना चहासाठी बोलावलं होतं. चार वाजता आमचा पूर्ण ग्रुप थर्ड फ्लोअर च्या कॅफेटेरियात पोहोचला.
"काय रे, पार्टी देतोस का?" मानसीने आल्या आल्या सवाल केला.
"अरे वा! पार्टी! मित्र असावा तर असा. कारण नसताना पार्टी देणारा." अभीने पुस्ती जोडली.
"बरं झालं. भूक लागली होती मला खूप. दुपारी थोडं कमीच जेवलो होतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह! थँक्यू ऋषभ." राकेश म्हणाला.
"एवढं उत्तेजीत होऊ नका मित्रांनो. खरंतर पार्टी तुम्हा लोकांना द्यावी लागणारे मला. पण तुम्ही एवढा आग्रह केलाच तर मला तो मोडवत नाहीए आता." ऋषभ म्हणाला.
त्याचं बोलणं ऐकून क्षणभरासाठी सगळे कन्फ्युज झाले.
"काय म्हणतोएस ऋषभ तू? कसली पार्टी द्यायचिए आम्ही तुला?" मी कपाळावरच्या अठ्यांसहित विचारलं.
"आणि तू असा कसा नुसतं आमच्या म्हणण्यावर पार्टीसाठी तयार झालास? काहीतरी गंभीर घडलंय याचा अर्थ." मानसी ऋषभ ल उद्देशून म्हणाली.
"गंभीर वगैरे काही नाहीए. काही दिवसांपूर्वी मी दुसर्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता जॉबसाठी. मी सहज म्हणून इंटरव्ह्यू देऊन आलो. मला वाटलंही नव्हतं की माझी निवड होईल. पण त्यांचा कालच कॉल आला जॉब ऑफर चा. म्हणलं सगळ्यांना एकत्र बोलवून सांगावं. या महिन्याअखेरीस मला ही कंपनी सोडावी लागणार आहे." ऋषभ मधेच बोलायचा थांबला.
काँग्रॅच्युलेशन्स, सही, एक नंबर, अभिनंदन, असे शब्द सगळ्यांच्या तोंडून निघाले.
"म्हणून म्हणलं तुम्हा सगळ्यांनाच मला पार्टी द्यावी लागणारे - फेअरवेल पार्टी."
"लेका एवढ्या चांगल्या पोस्टवर एवढं इन्क्रिमेंट मिळाल्यानंतर पण तू आमच्याकडं पार्टी मागतोएस? मानसी बरोबरच बोलली असा कसा तू चाय पार्टी द्यायला तयार झालास. एवढ्यावर नाही भागणार मित्रा. जंगी पार्टी पाहिजे तुझ्याकडून." राकेश म्हणाला.
"हो म्हणजे ही चाय पार्टी देतोय तर राहू दे आता, पण नंतर मस्त सेलिब्रेट करू आपण. आणि फेअरवेल पार्टी पण असेलच." अभी म्हणाला.
"चला एकदाचा सुटलास तू आयुषच्या तावडीतून." मानसी म्हणाली.
"सगळ्यात जास्त त्याचाच आनंद आहे." ऋषभ हसत म्हणाला.
पुढचा अर्धा तास ऋषभ त्याच्या नवीन जॉब विषयीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होता. सगळे शब्द माझ्या कानांवर पडत होते पण त्यांना समजण्याचा मनस्थितीत नव्हते मी.
असं म्हणतात की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्याकडे नसते तेव्हा आपल्याला त्याची खरी किंमत कळते. ऋषभ जाणार या गोष्टीने मी फार बेचैन झाले. आतापर्यंत त्याच्याविषयी मी माझे मन बनवले होते. त्याला माझ्यात इंटरेस्ट नाही हे जनवल्यापासून मी पण हळूहळू सावरलं होतं स्वतःला. माझं स्वतःचं मत त्याच्याविषयी कधीच स्पष्ट नव्हतं त्यामुळे ते थोडं सोपंही झालं. पण तो जाणार या विचाराने त्याच्याविषयीच्या सुप्त भावना परत उफाळून आल्या.
ऋषभची फेअरवेल पार्टी आम्ही तो जायच्या एक आठवडा आधीच केली. शेवटचा आठवडा आमच्या दोघांचाही नाईट शिफ्टचा होता त्यामुळे ऑफिसमध्ये सगळे एकत्र असण्याची तीच वेळ होती. खूप गप्पा विनोद झाले त्या दिवशी. नंतर गाडी थोडी 'हार्ट टू हार्ट' मनोगतांकडे वळाली. जसजसा एक एक जण बोलू लागला तसतसं सगळ्यांना जाणवू लागलं की ग्रुप कुठून कुठपर्यंत कसा आला होता. इट वॉज अॅन एंड ऑफ अॅन इरा. पुढे भेटू, बोलू, या वयद्यानबरोबर सगळे घरी रवाना झाले. मनात सगळ्यांना माहिती होतं की वेळेच्या प्रवाहात ही नाती नंतर मागे पडणार होती.
पऋषभबरोबर शेवटचा आठवडा मात्र मस्त गेला. सोडून जाणार म्हणून त्याला कामाचा ताण नव्हता. मलाही काही अर्जंट काम नव्हतं. त्यामुळे OAT च्या पायर्यांवर चांगल्या गप्पा रंगायच्या आमच्या. त्यावेळेस येणाऱ्या काही दिवसात तो जाणार याचा विसर पडायचा. फक्त वर्तमानात जगायचे मी. शेवटच्या दिवशी कॅबच्या वेळेच्या एक तासभर आधी ऋषभ माझ्या क्युबिकल मध्ये माझ्या शेजारी येऊन बसला.
"किती काम करणार गार्गी तू? बास कर आता." ऋषभ खोडकरपणे म्हणाला.
"काय काम केलंय मी या आठवड्यात? तुझं काय तू तर कंपनी सोडून चाललाएस. तुझ्यामुळे मी पण माझं काम बाजूला ठेवलंय."
"हं. त्यामुळेच तू माझी बेस्टस्ट फ्रेंड आहेस."
"पण तू इकडे कसा आलास? आयुष नाहीयए वाटतं जाग्यावर?"
"अरे आयुषला कोण भीक घालतंय? आणि मी तर नाहीच नाही." मागे वळून आयुष आहे का ते बघत ऋषभ उत्तरला.
"हो बघितलंय मी ते बऱ्याच वेळा."
"बोर होत होतं नुसतं बसून तिकडे. म्हणलं शेवटच्या काही गप्पा माराव्यात तुझ्याशी."
"कंपनी सोडून चाललाएस, जग नाही. आणि आत्ताच तर गप्पा मारून वर आलो होतो आपण."
"हो पण आज गप्पांमध्ये मजा नाही आली एवढी. आणि तू केव्हापासून बोलण्याचा चान्स सोडू लागलीस?"
"ए... मी एवढं पण नाही बोलत बरं का!"
"हो का? तुला आपली पहिली भेट आठवते? तुला मी टीममधे नवीन जॉईन झालीस का म्हणून विचारलं होतं आणि तू पूर्ण हिस्टरी-जॉग्रफी सांगितली होतीस."
"हो आठवतंय ना. पण मुद्द्याचच बोलले होते तेव्हा मी. ऑफिसमध्ये तू एकटाच काम करत होतास मला वाटलं होतं एकदम सिन्सिअर मुलगा आहे."
"वाटलं होतं म्हणजे काय? सिन्सियरच आहे मी. दिलेलं काम अगदी शेवटच्या क्षणी एकदम सिन्सिअरली करतो मी."
पुढचे पंधरा मिनिटे आम्ही आमच्या सुरुवातीच्या दिवसांची उजळणी करत होतो. सिंहगडच्या ट्रिपचा विषय निघाला आणि बस मधली ती आठवण ताजी झाली. थोड्यावेळात ऋषभ जाणार याची प्रकर्षाने जाणीव झाली. मला पुढे काही बोलवेना. कंठ दाटून आला होता. डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायला लागल्या होत्या. माझा तो अवतार बघून ऋषभ ही शांत झाला. मी ऋषभ कडे बघून हसायचा प्रयत्न केला पण तो साफ फसला. मला बघून ऋषभ समजावणीच्या स्वरात म्हणाला, "अगं एवढं टेन्शन का घेतेस? तूच म्हणालीस ना की कंपनी सोडून चाललोए जग नाही म्हणून. यानंतर पण भेटत राहूच की आपण."
"हो माहितीए मला. पण तू माझा सगळ्यात चांगला मित्र होता इथे." आणखी काहीतरी बोलायचं होतं मला पण पुढे काही बोलवेना.
"हो आणि पुढे पण चांगलाच मित्र राहील. बाकीचे आहेतच की इथे. काय माहिती माझ्या जागी जो कोणी येईल त्याच्याशी किंवा तिच्याशी चांगली मैत्री होईल तुझी. कदाचित माझ्या पेक्षाही जास्त चांगली."
मी शांतच आहे हे बघून ऋषभ पुढे बोलला.
"मला पण तुझ्याएवढंच वाईट वाटतंय सगळ्यांना सोडून जाताना, तुला सोडून जाताना. मन तर माझंही नाहीए. पण या गोष्टी होतच राहतात. सगळंच आपल्याला आवडतं म्हणून अगदी तसंच्या तसं राहत नाही. उद्या तू हा प्रोजेक्ट सोडून जाशील कदाचित. भेटणं - निरोप घेणं, हे चालूच राहणारे आणि त्याने येणारे आनंद - दुःख हे पण चालूच राहणार आहे. जुन्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवलं तर नवीन अनुभव येणार कुठून? तू असा विचार कर, यामुळे आणखी एका नवीन व्यक्तीशी मैत्री होईल तुझी. आणि आपले जुने मित्र आहेतच की. कदाचित मी गेल्यावर आयुष तुझा नेक्स्ट बेस्ट फ्रेंड होईल. यू नेवर नो."
त्याच्या त्या वाक्यावर डोळ्यातनं आसवाचे दोन थेंब पडले, पण ओठांवरही हसू आलं. त्याला एक चापट लगावली मी.
शिफ्ट संपवून आम्ही आमच्या कॅबमध्ये बसलो. आमच्या रूटवर आज आम्ही दोघेच होतो. माझं घर अवघ्या दहा मिनिटांमध्ये येणार होतं. कॅब माझ्या घराच्या गल्लीत शिरली. ऋषभकडे बघत मी म्हणाले, "आठवण राहू द्या आमची, ऋषभ सर."
माझा हात हलकेच दाबत तो म्हणाला, "माझ्या सगळ्यात फेवरेट स्टुडन्ट ला कसा विसरु शकेल मी?"
कॅब थांबली. मी गाडीतून खाली उतरले.
"गुड नाईट गार्गी." ऋषभ म्हणाला.
"गुड नाईट अँड गुड बाय." मी म्हणाले.
ड्रायव्हरने एक्सिलेटरवर पाय ठेवताच गाडी पुढे निघून गेली, मला अंधारात सोडत, एकटंच.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा